राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले आहेत. सुरुवातीच्या काळात अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सौम्य भूमिका घेतली जात होती. मात्र, गेल्या काही काळापासून स्वत: अजित पवार शरद पवारांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अलीकडेच कर्जत येथे पार पडलेल्या वैचारीक मंथन मेळाव्यातून अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर विविध आरोप केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीकास्र सोडलं. जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत अजित पवारांनी टीका केली. यावर आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) खात्यावर पोस्ट लिहून अजित पवारांवर मिश्कील टिप्पणी केली. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटाचा फोटोही शेअर केला.
एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “दादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला. तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अब्ज’ तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो आहे. त्यात तुमची ढेरी दिसत आहे. हाहा”