Trump-Zelensky Dispute: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसला भेट दिली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याचबरोबर या घटनेची जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. जगभरातील अनेक नेत्यांनी या घटनेनंतर युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, “हा सबंध जगाला घाबरवण्याचा प्रयत्न होता की, युक्रेन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगाला घाबरवण्याचा प्रयत्न होता की…

ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यातील वादाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यातील चर्चा उघडपणे सर्वत्र दाखविली गेली, याचा अर्थ मला तरी समजलेला नाही. हा सबंध जगाला घाबरवण्याचा प्रयत्न होता की युक्रेन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता?”

युक्रेनवर वाकडी नजर

आपल्या एक्स पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “युक्रेन हा खनिज संपत्ती, तेल, सूर्यफूल या उत्पादनात अतिशय सधन देश आहे. या देशातील गव्हाचे उत्पादन तर जगात प्रथम क्रमांकावर आहे. युक्रेन हा देश नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. म्हणूनच रशियाची युक्रेनवर वाकडी नजर होती. आता अडचणीत आलेल्या युक्रेनला ताब्यात घेण्यासाठी ट्रम्प यांचीही युक्रेनवर वाकडी नजर पडली आहे. प्रश्न हाच आहे की हा नवसाम्राज्यवाद जन्माला येतोय. छोट्या राष्ट्रांना घाबरवून त्यांना आपण ताब्यात घेऊ शकतो, असा इशारा कालच्या चर्चेतून संपूर्ण जगाला दिला आहे.”

आपण साधा आवाजही उठवला नाही

या पोस्टमध्ये आव्हाडांनी ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवल्याच्या घटनेवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, “दोन देशांचे राष्ट्राध्यक्ष ध्वनिक्षेपकावर चर्चा करतात, हे अत्यंत हास्यास्पद आहे. अगदी नवरा-बायकोमधील वादही बंद दाराआड होतात, रस्त्यावर येऊन वाद घातले जात नाहीत. तेव्हा या नव साम्राज्यवादाचा सर्वाधिक धोका कोणाला असेल तर तो भारताला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक भारतीयांना दोन लष्करी विमानात कोंबून परत पाठविले आहे. आपण त्यांच्या बाजूने उभे रहायचे सोडा, साधा आवाजही उठवला नाही.”