Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी, नवा अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यासाठी एक वरिष्ठ नेत्यांची समिती सूचवली. ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
शरद पवारांचा हा निर्णय ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. “आपण सर्वाचे अश्रू आणि भावनाही पाहत आहात. गेल्या ६० वर्षांच्या काळात कार्यकर्त्याच्या मनात काय चाललंय, हे बघणारे जादूगार आहात तुम्ही. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे. २००४ साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत असताना आम्ही तुम्हाला प्रचार करताना पाहिलं आहे. आताची तब्येत तुलनेनं खूप बरी आहे. त्यामुळे तुम्ही हा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान सायंकाळी शरद पवारांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा तीच मागणी पुढे केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांच्या या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून उग्र प्रतीक्रिया येत आहेत. ही उग्रता उद्यापासून अधिक वाढीला लागेल.
हे ही वाचा >> शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून तीव्र आंदोलनं सुरू होतील. लोक पवार साहेबांचंही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी राजीनामा मागे घेतला पाहिजे, हीच त्यांची मागणी आहे. मी स्वतः ३५ ते ४० वर्ष राजकारणात आहे, त्यांचं बोट धरून पुढे आलो आहे. ते राजकारणात नसतील तर आम्ही तरी कशाला राहायचंय या राजकारणात. संपलं आमचं पण राजकारण. हीच भावना अनेकांची आहे. शरद पवार हे लोकभावनेचा आदर करणारे, लोकशाही मानणारे नेते आहेत. ते लोकांच्या भावनेचा आदर करतील, ते सकारात्मकपणे विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील.