Jitendra Awhad Congratulates Rahul Narvekar : विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळवल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ६ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडला. त्यानंतर आता नवनिर्वाचित आमदारांनी आज राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. कुलाबा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपाचे राहुल नार्वेकर यांना सलग दुसऱ्यांचा विधानसभेचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. नार्वेकरांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांतील आमदारांनी अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर भाषण केले. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ताजमधील केक आणि कॉफीचा केलेला उल्लेख सध्या चर्चाचा विषय ठरत आहे.
सर्वोच्च न्यायालयालाही पेच
भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची आज विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नार्वेकरांचे अभिनंदन करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठारावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. मागच्या अडीच वर्षात तुम्ही जे न्यायदानाचे काम केले, त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. खासकरुन जेव्हा न्यायालयात दोन पक्षांचे वाद चालू होते त्यामध्ये आपली भूमिका निष्पक्ष होती. पण मला सर्वात जास्त कौतुक याचे वाटते की, आपण दिलेल्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयालाही पेच पडला आहे. त्याच्यातून ते मार्गच काढू शकले नाहीत. आपल्या न्यायदानाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले. आता तुमची संविधानाच्या १०वी सूची सुधारणा समितीमध्येही निवड झाली आहे.”
कॉफी, केक अन् जितेंद्र आव्हाड
यावेळी बोलताना आव्हाड पुढे म्हणाले की, “विरोधी पक्षातील आमदारांच्या संख्येवर बरेचजण बोलले आहेत. अशात आपण विधानसभेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करायला उभे आहोत याचे भान तरी असायला पाहिजे. अध्यक्ष महोदयांचा सन्मान राहिला बाजूला हे दुसराच इतिहास मागे पुढे करायला लागले आहेत. आम्ही मनापासून अध्यक्षांचे अभिनंदन करतो. आपण मागच्या अडीच वर्षांत जी परंपरा पाळली ती, कायम ठेवाल. आपल्या दालनात आल्यानंतर चांगली कॉफी आणि ताजमधील केक अजूनही आम्हाला मिळतील तसेच न्यायही द्याल अशी अपक्षा व्यक्त करतो.”
नार्वेकरांचा विक्रम
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बसणारे राहुल नार्वेकर हे आतापर्यंचे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. नार्वेकर हे मावळत्या विधानसभेत अडीच वर्षे अध्यक्ष होते. यापूर्वी १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७ आणि १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२ या ९ वर्षे ३६२ दिवसांच्या कालावधीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे यांना हा मान मिळाला होता.