राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून आज मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं आहे. अजित पवार गटाकडून मुंबईतील एमईटी येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर शरद पवार गटाकडून वाय बी चव्हाण सेंटर सभागृहात मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यांतून दोन्ही गटातील नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन घरी बसावं आणि आशीर्वाद द्यावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडलं. ठाण्यातील तो पठ्ठा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे असे पक्ष सोडून गेले, असा आरोप अजित पवारांनी केला. अजित पवारांच्या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला जे बोलायचं आहे, ते तुम्ही बोलू शकता. पण शरद पवारांवर जे काही बोलला आहात, त्याच्याविरोधात मी उभा आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- “…तोपर्यंत चिंता करायची गरज नाही”, ‘घड्याळ’ चिन्हाबाबत शरद पवारांचं मोठं विधान!

अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्यामुळे पक्षाचे नेते पक्ष सोडून गेले, असं त्यांना तसं वाटत असेल. तर ठीक आहे. अजित पवारांबद्दल माझी काहीही तक्रार नाही. माझी तक्रार फक्त एकच आहे. शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी आणि घरी बसावं, ही जी भावना तुम्ही व्यक्त करताय, त्याविरोधात मी उभा आहे.”

हेही वाचा- शरद पवारांकडे संख्याबळ किती? बैठकीला कोणते आमदार-खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी

“तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं आहे, ते तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे. पण जो कर्तृत्ववान मुलगा असतो, तो आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी सांगतो, तुम्ही काम करत राहा. पण तुम्ही (अजित पवार) तर सगळे मिळून त्यांना निरोपच देत आहात. घरी बसायला सांगत आहात. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, ते घरी बसणार नाहीत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction on ajit pawar criticism over sharad pawar retirement rmm
Show comments