ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये बावनकुळे हे एका कसिनोमध्ये (जुगार खेळण्याचं ठिकाण) बसल्याचं दिसत आहेत. मकाऊ येथील कसिनो जुगारात साडेतीन कोटी रुपये उडवल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे. शिवाय आपल्याकडे कसिनोमधील २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत, असा दावाही केला आहे.
संजय राऊत यांनी बावनकुळेंचा कसिनोमधील फोटो शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विविध राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता पार्टीने संजय राऊतांचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. पण यानंतर संजय राऊतांनी थेट भाजपाला इशारा दिला आहे. जेवढे खोटे बोलाल, तेवढे फसाल, असं संजय राऊतांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : “महाराष्ट्र पेटलाय अन् हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत…”, बावनकुळेंचा ‘तो’ फोटो ट्वीट करत राऊतांचा हल्लाबोल
बावनकुळेंचा कसिनोमधील फोटो शेअर करत संजय राऊतांनी केलेल्या दाव्याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “संजय राऊत जे बोलतात, ते सत्य बोलतात. एवढं मला माहीत आहे.” या वक्तव्याने आव्हाडांनी एकप्रकारे संजय राऊतांच्या दाव्याचं समर्थन केलं आहे.
“मी भाजपाचं दुकान बंद करणार नाही, कारण..”
“माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. मात्र, आमच्यात माणुसकी आहे. २७ फोटो आणि व्हिडीओ समोर आणले, तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल. पण, मी ते करणार नाही. कारण, हे दुकान २०२४ पर्यंत चाललं पाहिजे. मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण, महाराष्ट्रात सामाजिक परिस्थिती काय आहे? आम्ही एखादी गोष्ट समोर आणल्यानंतर ट्रोलधाडीनं काहीतरी सांगायचं. मात्र, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कुटुंबाबरोबर असल्याचं सांगितलं जात आहे. मग, फोटोत चिनी कुटुंब आहे का? जेवढे खोटे बोलाल, तेवढे फसाल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.