राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. राष्ट्रवादीमधील या बंडखोरीमुळे पक्षात दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आता एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
अलीकडेच जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे बंडखोर गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, बंडखोर आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर आपला दावा ठोकला आहे. दुसऱ्या कुणालाही आमच्या कार्यालयात येऊ देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
हेही वाचा- “अजित पवारांपेक्षाही मला आश्चर्य वाटतं ते म्हणजे भुजबळ आणि…” रोहित पवार यांचं वक्तव्य चर्चेत
छगन भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आता हे सगळीकडे होणार आहे. आमचीही वेळ येईल, वेळ कुठे जात नसते. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेबाबत जो निकाल दिला आहे, तो निकाल यांच्यासाठी (राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार) गळफास ठरेल.”
हेही वाचा- “नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती…”, शिंदे गटातील आमदाराची प्रतिक्रिया, म्हणाले…
खरं तर, राज्यातील बदललेल्या समीकरणांमुळे राष्ट्रवादी पार्टीत दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजित पवार व छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. यानंतर आता कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.