आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात आहेत. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस जर धीरेंद्र शास्त्रींना भेटले असतील तर ती त्यांची वैयक्तिक आस्था असेल, पण समाजातील इतर लोकांनी बागेश्वरपासून चार हात दूर राहावं, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “आईचं डोकं फुटलं आणि बाळाच्या अंगावर रक्त…”, मनोज जरांगेंनी सांगितला लाठीमारबाबतचा घटनाक्रम
देवेंद्र फडणवीस आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “असं आहे की प्रत्येक निवडणुकीत त्यांना (भाजपा) एक बाबा लागतो. दुर्दैवाने महाराष्ट्राची पुरोगामी संत परंपरा असताना, मुद्दामहून जातीभेद मानणारे संत यांना लागतात. बागेश्वर बाबा हा जातीभेद मानणारा संत आहे. मुळात तो संतही नाही. पण नेमकं त्यालाच भाजपा पुढे करते.”
हेही वाचा- “बावनकुळेंनी त्यांच्या सहकाऱ्यांना…”, कसिनोतील फोटोवरून संजय राऊतांचा भाजपाला इशारा
“बागेश्वर हा काय करतो? हेच मला समजत नाही, पण हे स्पष्ट आहे की, तो प्रचंड जातीवादी आहे. वर्ण व्यवस्थेला मानणारा माणूस आहे. त्यामुळे बहुजनांनी तर त्याच्या सावलीतदेखील उभं राहू नये. इतका तो जातीय विष ओकत असतो. देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले असतील तर ती त्यांची वैयक्तिक आस्था असेल. पण समाजातील इतर लोकांनी या बागेश्वरपासून चार हात दूरच राहिलं पाहिजे,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला.