गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. अशातच आज ईडीनं मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ईडी कारवाईच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणं हे सुडाचं, द्वेषाचं आणि असुयेचं राजकारण वाटतं. विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना अस्थिर करणं हे त्यांचं काम आहे, त्यात काही गैर नाही. पण अशा पद्धतीनं कारवाई करणं चुकीचं असल्याचं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
“तुम्ही आम्हाला जेवढे जास्त डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, तुम्ही डिवचताय म्हणून आम्ही कधीही कोसळून पडणार नाही. घरात घुसून सरकार पाडू अशी त्यांची मानसिकता असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला सगळं उघड्या डोळ्यांनी दिसतंय की राज्यात काय चालू आहे. महाराष्ट्राची जनता आंधळी नाही, त्यांना सुडाचं राजकारण दिसतंय. तसेच हे पाहुणे महाविकास आघाडीतील सर्वांच्या घरी जाणार असतील तर आम्ही पोहे आणि चिवड्याची सोय नाश्त्यासाठी करून ठेवली पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.
लोकशाहीत जामीनच मिळणार नाही, असा कायदा करून त्याची भीती दाखवणं ही लोकशाहीची गळचेपी असल्याचं आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.