“स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजू बाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आली नाही”, असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता गदारोळ झाला आहे. संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
तुम्हाला लाज वाटत नाही का?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “योगेश कदम म्हणतात की पीडिता ओरडली नाही. यांना काही लाज, लज्जा, शरम? तुम्हाला लाज वाटते की नाही? तुम्हाला आया-बहिणी आहेत की नाही? एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्यावर तुम्ही म्हणता की ती ओरडली नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय?” असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ” योगेश कदम लहान आहेत, माझं त्यांच्या वडिलांना सांगणं आहे की तुम्ही फार परिपक्व आहात. सांगा त्यांना की असं बोलायचं नसतं. आता ते (योगेश कदम) मंत्री आहेत, राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे.” असा सल्लाही त्यांनी दिला.
संजय राऊतांनी केली टीका
“पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केलं म्हणजे फार उपकार केले नाहीत. स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडते आणि त्या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री काय बोलतात? ते म्हणाले की सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहेर काही कळलं नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका? एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केलं नाही. अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला. खरं म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर टीका केली.