छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे.
“केतकी चितळे इतकी विकृत असेल याची कल्पनाही करवत नाही. आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तिने काय लिहिले आहे ते लोकांना वाचावे आणि तेच तुमच्या आजोबांबद्दल किंवा वडिलांबद्दल लिहिले तर काय वाटेल याचा विचार करा. ज्या माणसाचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले आहे त्यांच्यासोबत राजकीय दृष्ट्या लढा. त्याला आम्ही उत्तर देतो. तुम्ही त्यांचा चेहरा कसा झालाय यावर बोलणार असाल तर उद्या आमच्या कार्यकर्त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या तर तुम्हाला ओरडता येणार नाही,” असे जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.
“माझ्यासारखा माणूस जो शरद पवारांसोबत ३५ वर्षे आहे तो हे कसे काय सहन करेल. आज महाराष्ट्रात १००-२०० पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत. शेवटी ते राष्ट्रवादीच्या कुटुंबाचे बाप आहेत. त्याच्यांबद्दल इतके घाण वाचून पहिल्यांदा डोळ्यात अश्रू येतात. तुम्हाला यात वाटत असेल काही होणार तर तसे नाही. यामध्ये पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण हे सर्व आमचं सरकार गांभीर्याने घेत नाही नाहीतर यामध्ये ज्यांनी रिट्विट केले आहे ते सुद्धा गुन्हेगार ठरतात. त्यामुळे माझं पद गेलं तरी बेहत्तर पण शरद पवारांवरील टीका आम्ही सहन करणार नाही. त्यांना वाटत असेल की मंत्रीपदासाठी हे घाबरतील पण तसे नाही. बापापुढे कोणी नाही. त्यामुळे असं करु नका माझी एवढीच हात जोडून विनंती आहे,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.