Jitendra Awhad Reacts on Rupali thombare : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. तसेच सर्वच स्थरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये शनिवारी मोर्चा काढला. या मोर्चात बोलताना अनेक लोकप्रतिनिधींनी वाल्मिक कराड मागचा सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
तसेच वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे व त्यांचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)) पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी झाले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार पक्ष) नेत्या रुपाली ठोंबरे यांनी या मोर्चावर शंका उपस्थित केली. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली ठोंबरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक कथित व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि जितेंद्र आव्हाड हे देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी आले होते, असं म्हणत हल्लाबोल केला. दरम्यान, यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी कथित व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात काही सवाल उपस्थित केले आहेत. “मोर्चातील माझं भाषण संपल्यानंतर लगेच व्हॉट्सअॅप चॅट स्क्रीनशॉट बाहेर कसा आला? मग त्याआधी सकाळी स्क्रीनशॉट का नाही आला?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“मी शनिवारी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार केली आहे. आता फक्त बीडच्या पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी पुढील कारवाई करावी. माझं भाषण संपल्या-संपल्याच व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट कसा समोर आला? मग व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट सकाळीच यायला हवा होता ना? मात्र, भाषण संपल्यानंतर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट अचानक कसा येतो?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
माझा खोटा वाॅटसॲप चॅटचा वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 29, 2024
फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा वाॅटसॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहाती मी ट्वीटद्वारे (एक्स… pic.twitter.com/HCimCzXnDY
धमक्यांचे मेसेज येत असल्याचा आव्हाडांचा आरोप
“आपल्याला कालपासून धमक्यांचे मेसेज येत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. आव्हाड म्हणाले, “मला आताही एक मेसेज आला आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत मेसेज आणि मारायची धमकी व शिवीगाळ करणारा मेसेज मला आहे. यावरून असं दिसतं की अजूनही मस्ती गेलेली नाही. आता हा थेट धमकीचा मेसेज आला आहे. मी हा मेसेजही पोलिसांना पाठवणार आहे. कुठेही यंत्रणेची भिती राहिलेली नाही. मग काय तर द्या धमकी. मात्र, मी असा न घाबरणारा आमदार आहे. मला शिव्या दिल्या तरी मी माझ्या मुद्यांवरून बाजूला होणार नाही. मी अजूनही सांगतो की माझी लढाई ही माणुसकीची आहे”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.