Jitendra Awhad : आपल्या राज्यात महापुरुषांना आणि संताना आडनावाने किंवा जातीने पाहिलं गेलं नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात या गोष्टी सुरू झाल्या. राज्यात जातीचं विष शरद पवार यांनी कालवलं, अशी टीका आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भाच्या दौऱ्यावर असताना केली होती. त्यांच्या या टीकेला आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या टीकेबाबतही विचारण्यात आलं. याबाबत बोलताना, राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांच्याकडे लक्ष देत जाऊ नका, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा – Raj Thackeray : “रोज येणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांमागे राजकारण की येणाऱ्या निवडणुका?”, राज ठाकरेंचा थेट प्रश्न; म्हणाले, “सरकारला बदनाम…”

“राज ठाकरे दरवेळी हेच बोलतात. पण जातीपातीचं राजकारण कोण करतं? कोण भोंगे पाडायला जातं? कोण उत्तर प्रदेशच्या लोकांना मारायला जातं? हे संपूर्ण देशाला माहिती आहे. राज ठाकरेंना फक्त बडबड करायची असते, ती त्यांना करू द्या त्यांच्याकडे जास्त लक्ष देत जाऊ नका”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाही, असंही राज ठाकरे म्हणाले होते. यासंदर्भात विचारलं असता, राज ठाकरेंनी आज सरकारवर टीका केली आहे, पण उद्या चालून ते एकनाथ शिंदेंबरोबर चहा पिताना दिसतील. एकनाथ शिंदे त्यांच्या घरी जातील, चहा आणि बिस्किट खाऊन येतील. त्यामुळे अशा लोकांबद्दल विचारात जाऊ नका, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा – Raj Thackeray Press Conference: “शपथा कसल्या घेताय? तुमच्या हातात…”, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला; ‘त्या’ कृतीवरून केली टीका!

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

विदर्भ दौऱ्यावर असताना आज राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीक केली. “राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्र बघितला, तर आपल्याला परिस्थिती लक्षात येईल. आपण आपल्या महापुरुषांना आणि संताना कधीही आडनावाने किंवा जातीने बघितलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. राज्यात जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं”, असं राज ठाकरे म्हणाले होते