महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून ( २७ फेब्रुवारी ) सुरुवात झाली. करोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. चहापानाला गेलो असतो, तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर केली होती.
अजित पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनीही प्रत्युत्तर दिलं. “दाऊदची बहिण हसीना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला. तरीही, अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही. बरे झालं, अशा राष्ट्रद्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली,” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा : अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे; विरोधी पक्ष आक्रमक, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
एकनाथ शिंदेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत, मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे, याचं उत्तर द्यावं,” असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
हेही वाचा : मी तुमच्याविरोधात ठाण्यातून लढतो; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान
“राज्याची दयनीय अवस्था झाली आहे. राज्य कर्जबाजारी झालं आहे. राज्यातील सर्व लोकांवर कित्येक हजारो रुपयांचं कर्ज आहे. ५० हजार कोटी, १ लाख कोटी, २५ हजार कोटी दिले, अशी फक्त घोषणाबाजी केली जात आहे. पण, दिले कुठं, द्यायला कटोराही नाही. त्यामुळे हे सर्व हास्यास्पद आहे. भाषणात फक्त आम्ही सहा महिन्यांपूर्वी असे सिक्स मारले, अशी बॅटिंग केली. मात्र, आता लोकांना कंटाळा आहे, नवीन काहीतरी बोललं पाहिजे,” असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.