मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बीडमधील सभेत बोलताना मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं होतं. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले होते. मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मला विधानपरिषदेवर पाठवा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्याचा दावा हसन मुश्रीफांना केला होता. याला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
“ठाण्यात एकदा आव्हाडांवर गुन्हा झाला होता. तेव्हा अजित पवार विरोधी पक्षनेते होते. अजित पवार आणि जयंत पाटलांना घेऊन आव्हाड अध्यक्षांच्या दालनात गेले. तिथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. तेव्हा आव्हाड फडणवीसांच्या पाया पडाले आणि म्हणाले, ‘मी आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मला विधानपरिषदेवर पाठवा’,” असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफांनी केला होता.
हेही वाचा : “पंतप्रधानांना राखी बांधली अन् ईडी थांबली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी प्रत्युत्तर देत म्हणाल्या…
“हे तुम्हाला सांगणारा मुर्ख कोण आहे?”
यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, “मी टीकेला घाबरत नाही. मी फडणवीसांच्या पाया पडल्या, असं मुश्रीफांनी सांगितलं. हे तुम्हाला सांगणारा मुर्ख कोण आहे? जयंत पाटलांनी तुम्हाला हे सांगितलं नाही. जयंत पाटलांचं तुम्ही नाव घेत असाल, तर त्यांनी तुम्हाला एका प्रकरणात मदत केली आहे. त्या प्रकरणात मदत करणारा कोणाचा माणूस होता, हे एकदा विचारून घ्या…. ती मदत किती मोठी होती, याची कल्पना तुम्हाला आहे.”
“मला विधानपरिषदेचा आमदार करा, असं मी म्हणालो, पण…”
“तेव्हा आपण एकत्र यायला पाहिजे, अशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं, मी येऊ शकत नाही. कारण, मी विचारधारा सोडणार नाही. तसेच असेल मला विधानपरिषदेचा आमदार करा, असं मी म्हणालो. पण, पाया पडलो नाही. कोणाचीही शपथ घेऊन मुश्रीफांनी हे घडलं असल्याचं सांगावं. कशाला खोटं बोलता. आयुष्यभर खोटेच बोलत आलात,” अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी मुश्रीफांवर केली आहे.
हेही वाचा : “दाढीवाल्याने भाजपाची पावडर लावली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…
“…तर मी कोणाच्याही बापाचं ऐकत नाही”
“रुग्णांच्या नावावर करोडो रुपयांची मुश्रीफांनी कमाई केली आहे. माझे तोंड उघडायला लावू नका. माझ्यावर टीका केली, तर त्याहून अधिक विषारी टीका मी तुमच्यावर करणार. माझी चूक नसेल, तर मी कोणाच्याही बापाचं ऐकत नाही. मी फक्त आई-वडील आणि शरद पवारांच्या पाया पडतो. ज्याच्याबरोबर आहे, त्याच्याबरोबर मरेपर्यंत राहणार आहे. अर्ध्यातून पळून जाणारा नाही,” असे म्हणत आव्हाडांनी मुश्रीफांना डिवचलं आहे.