अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“राष्ट्रवादीचे हे छुप राजकारण आहे. त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेही कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात समजू शकतो. कारण, त्यांचं राजकारण हे घड्याळाप्रमाणे आहे. घड्याळाला पेंडुलम असतो, तो कधी उजव्या आणि कधी डाव्या बाजूला जातो. तसेच, राष्ट्रवादीचे राजकारण काहीवेळा उजवीकडे, तर काहीवेळा डावीकडे असतं. सध्याची निवडणूक त्यांच्यासाठी उजवीकडची आहे,” असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “लग्न एकाशी करायचे आणि हुंडा दुसऱ्याकडून घ्यायचा, ही सवय काहींना आहे,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटरवर एक मीम शेअर करत शरद पवार यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. “जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली होती. तुम्हाला (शरद पवार) जर द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याबरोबर (भाजपा) जायचं असेल, तर खुशाल जावा. पण, तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला फसवू नका. शरद पवार हे नेहमीच दुतोंडी वागले आहेत. ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात,” असं ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.