राज्यातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित असल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवावी असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आज दिवसभर अधिवेशनामध्ये चर्चेत राहिला. मात्र याच मुद्द्यावरुन चर्चा करणाऱ्या भाजपाला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खडे बोल सुनावले आहेत. आजारपणावरुन चर्चा करणं हे विकृतपणाचं आहे असं आव्हाड म्हणालेत.

दुपारी विधानसभेच्या सदनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन सुरु असणाऱ्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, “विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> “अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता करणार आहात का?”

पुढे बोलताना, “मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाहीय. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येणार. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे,” असंही आव्हाड म्हणाले.

“आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणं हेच मला मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

नक्की वाचा >> “रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असल्याचं ऐकलंय, ते तरी खरं आहे का सांगा?”

पत्रकारांनी पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे द्यावी अशी मागणी केल्याचा प्रश्न विचारला असता आव्हाड, “मी माझ्या शब्दात उत्तर दिलेलं आहे. मला वैयक्तिक कोणाच्याही प्रश्नाला उत्तरं द्यायची नाहीयत,” असं म्हणत पुढच्या प्रश्नाकडे वळले.

Story img Loader