अजित पवार खासदार असताना दिल्लीत जेव्हा त्यांची भाषण करायची वेळ यायची तेव्हा ते बाथरूममध्ये जाऊन बसायचे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आव्हाड म्हणाले, “अजित पवारांना हिंदीत भाषण करता येत नाही. त्यामुळे त्यांचा पीए (स्वीय सहाय्यक) त्यांना भाषण लिहून द्यायचा.” अजित पवार यांनी आज (शुक्रवार, १६ फेब्रुवारी) बारामती येथे भाषण करताना शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच बारामतीकरांना भावनिक साद घातली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार भाषणाची वेळ आली की मंचावरून पळून जायचे. संसदेत भाषणाची वेळी आली की नेमके बाथरूममध्ये असायचे. कारण त्यांना हिंदी बोलता येत नाही, इंग्रजीदेखील बोलता येत नाही. अजित पवारांच्या या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. तर आता आम्हाला त्या मर्यादा लोकांना सांगाव्या लागतील. जेव्हा जेव्हा त्यांची दिल्लीत भाषण करायची वेळ यायची तेव्हा तेव्हा ते बाथरुममध्ये असायचे. कारण भाषण करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. यांचा पीए यांना भाषण लिहून द्यायचा मग ते भाषण बोलून दाखवायचे.

शरद पवार गटातील आमदार म्हणाले, शरद पवारांची लोकप्रियता जेव्हा हिमालयाएवढी होती. तेव्हा अजित पवार खालून पिन मारून पंक्चर करायचे. कधी राजीनामा द्यायचे, तर कधी वादग्रस्त, विचित्र वक्तव्य करायचे. आमदार आव्हाड अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्ही विरोधी बाकावर येऊन भाषण करायचे… काय भाषण करायचे…? तुमचा पीए भाषण लिहून द्यायचा. त्यात पण विरोधी पक्षावरची महत्त्वाची टीका तुम्ही बाजूला काढून टाकायचे. विरोधी पक्ष म्हणजे तेव्हाचा सत्ताधारी पक्ष. सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षनेते होता तुम्ही, परंतु, तुम्ही विरोधी पक्षाचे विरोधक असल्यासारखी वक्तव्ये करायचात. सत्ताधाऱ्यांच्या टीपांवर वागणारा विरोधी पक्षनेता म्हणजे अजित पवार.

“तुम्ही शरद पवारांच्या रक्तात होता”

जितेंद्र आव्हाड अजित पवारांना म्हणाले, तुम्ही शरद पवारांच्या रक्ताचे नसलात तरी तुम्ही नेहमीच त्यांच्या रक्तात होता. म्हणूनच त्यांनी तुम्हाला मंत्रिमंडळात इतकी महत्त्वाची खाती सांभाळायला दिली. त्या प्रेमापोटीच तुम्ही इतकी मंत्रिपदं भूषवली. तुमची वादग्रस्त वक्तव्ये, तुमच्या चुका या नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी घातक होत्या, तरीदेखील शरद पवारांनी त्या पाठीशी घातल्या, आपल्या पोटात घेतल्या आणि तीच शरद पवारांची मोठी चूक होती. तुम्ही कुठे काय बोललात, धरणात ### गेलात वगैरे वक्तव्ये संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. परंतु, याच चुका जितेंद्र आव्हाडने किंवा आमच्यापैकी इतर कुठल्या नेत्याने केल्या असत्या तर शरद पवारांनी त्याला पक्षात ठेवलं असतं का?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad says ajit pawar used to hide in bathroom before giving speech asc