शिवसेनेचे ४० आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन बसले आहेत. त्यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली आहे. परंतु या आमदारांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच शिवसेनेचे १३ खासदार शिंदे गटात आहेत. त्यांच्यापैकी काही खासदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर नुकतीच मांडली. तेव्हापासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कीर्तिकर म्हणाले, शिंदे गटातील खासदारांना एनडीएत भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत आहेत. त्यामुळे आता हळूहळू शिंदे गटातील इतर नेतेही बोलू लागतील अशी चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (२८ मे) एका भाषणादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार परतण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. आव्हाड म्हणाले, आमदार बालाजी किणीकर मातोश्रीवर परतण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आज या मंचावरून सांगतो बालाजी किणीकर तुम्ही आता बॅग पॅक करा. तुम्हाला घरी जायचं आहे.
आव्हाड म्हणाले, मला माहिती आहे, मी या मंचावरून सांगतोय, बालाजी किणीकर इकडे तिकडे बोलत फिरत आहेत की, मला काहीही करून कसंही करून मातोश्रीवर परत न्या. त्यामुळे आता बॅग पॅक करायला घ्या.
हे ही वाचा >> VIDEO: “भाजपाच्या आशीर्वादाने दावा करणारेच नवनीत राणांच्या प्रचाराला येतील”, बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
गजानन कीर्तिकर काय म्हणाले?
भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची खंत व्यक्त करत शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर यांनी आमची कामे होत नसल्याची तक्रार केली आहे. आमची शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील म्हणजेच एनडीएतील एक घटक पक्ष असून तसा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे, अशी मागणीही कीर्तिकर यांनी यावेळी मांडली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात २२ जागा शिवसेनेच्या आहेत त्या शिवसेनेलाच मिळायला हव्यात, असंही कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.