गेल्या वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात बंड केलं. पक्षातील ४१ आमदारांना बरोबर घेत ते राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार गटाला बहाल केलं. त्यामुळे शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आज त्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत काय-काय घडलं याबाबत शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे माहिती दिली आहे.
आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रातील पक्षफुटीनंतर अपात्रतेची लढाई चालू आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील आमची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. आज (८ जुलै) आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं. आमची बाजू ऐकल्यानंतर, “२३ तारखेला याबाबत सुनावणी लावून घ्यावी, मी स्वतः हे प्रकरण ऐकणार आहे,” असं सरन्यायाधीश म्हणाले. महाराष्ट्रातील गद्दारी लोकांसमोर आली पाहिजे अन् त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, यासाठी आमचा हा लढा चालू आहे. कारण, महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृतीचा हा भाग असून आपले संस्कार आणि संस्कृती वाचवली पाहिजे.
हे ही वाचा >> छ. संभाजीनगरचे माजी उपमहापौर अनेक नगरसेवकांसह ठाकरे गटात, भाजपाला खिंडार? भागवत कराड म्हणाले…
सरन्यायाधीश आमदार अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी करणार
आव्हाड म्हणाले, चौथ्या क्रमांकाच्या न्यायालयात न्यायाधीश सुर्यकांत यांच्यासमोर १६ व्या क्रमांकावर नागालँडच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी लागली होती. या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून दोन मिनिटात नोटीस काढण्याचे आदेश दिले, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. याच प्रकरणात त्यांना महाराष्ट्रासंबधातील मुद्दे सांगितल्यानंतर त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले. आम्ही त्यांना सांगितलं की, ३ एप्रिलपर्यंत अजित पवार गटाला आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश आपण दिले होते. मात्र, अजित पवार गटाने आजपर्यंत आपलं म्हणणं मांडलेलं नाही. ही बाब ऐकल्यानंतर सरन्यायाधीश म्हणाले, “हे प्रकरणही १६ तारखेच्या कामकाजात घ्या, हे प्रकरण मी ऐकणार आहे.” आता आनंदाची गोष्ट ही आहे की, तिन्ही याचिकांसंदर्भात, नागालँडमधील एक आणि महाराष्ट्रातील दोन याचिका न्यायालयासमोर आहेत. त्यांच्या तारखा लागलेल्या आहेत. त्यामुळेच आता आम्हाला अपेक्षा आहे की, येत्या एक दीड महिन्यात या सर्व याचिकांवरील सुनावणी संपलेली असेल अन् महाराष्ट्राला न्याय मिळेल. या याचिकांसंदर्भात शरद पवार अत्यंत गंभीर असून त्यांनी सर्वांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करून या याचिका अत्यंत ताकदीने लढण्याचे निर्देश दिले आहेत.