ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. मारहाण प्रकरण आणि कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दोन पेन ड्राईव्ह दाखवले आणि दावा केला की, “यामध्ये महेश आहेर या अधिकाऱ्याच्या ८ तासांच्या ऑडियो क्लिप्स आहेत. यातल्या काही निवडक क्लिप्स आम्ही बाहेर काढल्या आहेत. परंतु खरा बॉम्बस्फोट अजून बाकी आहे.”
आव्हाड म्हणाले की, “महेश आहेर याने माझ्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली, दाऊद गँगला सुपारी दिल्याचं बोललं होतं. त्यानंतर मला वाटलेलं की संवेदनशील सरकार यावर काहीतरी कारवाई करेल. किमान त्याची बदली करेल. परंतु तसं काही झालं नाही. उलट सरकारकडून सांगण्यात आलं की, या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला देऊन तपास करणार.”
आव्हाड म्हणाले की, “आता महेश आहेर याची नवीन ऑडिओ क्लिप आली आहे. यामध्ये तो पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय. तो म्हणतोय की मी टाईट होऊन (मद्यप्राशन करून) मुख्यमंत्र्यांना फोन केला. मी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतोय.” आव्हाड म्हणाले की, “तो असं फोनवर बोलत असला तरी मला खात्री आहे की, मुख्यमंत्र्यांना यातलं काही माहिती नसेल, कारण मी त्यांना जवळून ओळखतो. परंतु हे आजुबाजूचे जे चमचे आहेत त्यांच्यामुळे मुख्यमंत्री त्रस्त आहेत.”
हे ही वाचा >> “अर्थसंकल्पात ४० आमदारांचे लाड पुरवण्यात आले”, एकनाथ खडसेंच्या विधानावर सत्ताधारी मंत्र्यांचा कडाडून आक्षेप; म्हणाले…
वरिष्ठ अधिकारी आहेरच्या पाठिशी? : आव्हाड
आव्हाड म्हणाले की, “आहेर फोनवर कोणाला तरी सांगतोय की, मी टाईट होऊन मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी तो फोन उचलला. त्यानंतर मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आले. अधिकारी मला म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.”