“देवेंद्र फडणवीस हे केवळ दिलीप वळसे पाटलांमुळे मुख्यमंत्री झाले.” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड म्हणाले, “सभागृहात (विधानसभा) दिलीप वळसे पाटील देवेंद्र फडणवीस यांना बोलण्यासाठी एक-एक तास द्यायचे. वळसे पाटील सभागृहात ज्या पद्धतीने कामकाज करायचे ते पाहून समजतं की विधानसभेचा अध्यक्ष कसा असायला हवा. स्पीकर असावेत तर असे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, दिलीप वळसे पाटलांमुळेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना वळसे पाटलांनी इतकी संधी दुसऱ्या कुठल्याही विधानसभा अध्यक्षांनी दिली नसती. विधानसभेत विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे एक तास बोलायचे, त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस एक तास बोलायचे. विधानसभा अध्यक्ष त्यांना खूप वेळ द्यायचे. त्यामुळे माझ्यासह आमच्या पक्षातील इतर विधानसभा सदस्य वळसे पाटील यांच्याशी वाद घालायचे. त्यावर वळसे पाटील म्हणायचे, मी निष्पक्ष आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही. आम्ही भांडल्यावर ते आम्हाला हेच उत्तर द्यायचे की स्पीकर (विधानसभेचे अध्यक्ष) हा निष्पक्ष असतो, मी देखील निष्पक्ष आहे, माझा तुमच्या पक्षाशी आता काहीच संबंध नाही. विधानसभेचा अध्यक्ष कसा असायला हवा याचा वस्तूपाठ दिलीप वळसे पाटलांनी घालून दिला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काही काम केलंय त्यासाठी मी त्यांना शंभर टक्के गुण देईन.

हे ही वाचा >> अजित पवार गटातून केंद्रात कोण मंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रीपद मिळणार असेल तर ते…”

२००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते तर एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते. या काळात विधानसभेच्या अधिवेशनांमध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या एकनाथ खडसे यांना सभागृहात बोलण्यासाठी जितका वेळ दिला जात होता तितकाच वेळ आमदार फडणवीस यांनाही दिला जात होता, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. त्यानंतर, २०१४ मध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे चारही पक्ष स्वतंत्र लढले. निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. मात्र भाजपाने राज्यात सर्वाधिक १२२ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ४१ जागांवर विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर भाजपाने राष्ट्रवादीने पाठिंब्यावर (बाहेरून) सरकार स्थापन केलं आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे १७ वे मुख्यमंत्री झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad says devendra fadnavis became maharashtra cm because of dilip walse patil asc