महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. चाकणकर सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाल्या होत्या, “माहेरी किती लुडबूड करावी, यालादेखील मर्यादा असतात.” चाकणकर यांच्या या टीकेला शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आव्हाड म्हणाले चाकणकरांचे हे विचार ऐकून त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्या आजही जुनाट आणि हजारो वर्षांपूर्वीच्या मानसिकतेत जगत आहेत. आव्हाड यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे.
आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना, “माहेरी किती लुडबूड करावी, यालादेखील मर्यादा असतात” , असं म्हणत तमाम स्त्री वर्गाचा अपमान केला आहे. आजच्या काळात स्री-पुरुषांमध्ये भेद राहिलेतच कुठे? अन् हे भेद नष्ट व्हावेत, यासाठी तर लढाई चालू असते. शरद पवार यांनी महिलांना दिलेले ५० टक्क्यांचे आरक्षण कशासाठी होते? राजकारणात मिळालेली संधी कशासाठी होती? याचं उत्तर आहे की, महिलाही पुरूषांइतक्याच कर्तबगार असतात आणि त्यांची कर्तबगारी सिद्ध करता यावी, या भावना शरद पवार यांच्या होत्या आणि आहेत. त्याच शरद पवार यांच्या मदतीसाठी त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी जर सुप्रिया सुळे लढत असतील, संघर्ष करीत असतील तर त्यास ‘लुडबूड’ म्हणून संबोधल्याने रुपाली चाकणकर यांच्या बुद्धीचीच किव येते.
एखाद्या मुलीला ती केवळ मुलगी आहे अन् ती सासरी गेली आहे, म्हणून तिचा माहेरचा अधिकार नाकारणे, हा प्रकार राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा जोतिबा फुले – सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अपमानच आहे. त्यामुळे जर आपले असे विचार असतील तर यापुढे किमान महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार तरी अर्पण करू नका. जर तुमचे विचार हजारो वर्षांपूर्वीचे किंवा जुनाट असतील आणि स्री – पुरूष भेदभाव तुम्ही आजही मानत असाल तर तुमची किवच करावीशी वाटते.
केवळ ‘ती’ मुलगी आहे, म्हणून तिचे अधिकार नाकारणाऱ्या काळातील तुम्ही आहात. त्याचवेळी इथे आमच्यासारखे वंशाला दिवा आहे किंवा नाही, असा विचार न करता, एका मुलीवरच समाधान मानून तिलाच सर्व अधिकार देणारे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे; आणि हो, जेवढं कौतूक आईपुढे ढाल म्हणून उभे राहणाऱ्या राहुल यांचे केले जाते; तेवढेच कौतुक आम्हा सर्वांना सुप्रिया सुळे यांच्याविषयी आहे. ज्या मुलीच्या बापाने आपुलकीने स्वकियांना आणि परकियांना मोठे केले आणि ज्यांना मोठे केले; त्यांच्याकडूनच ‘तिच्या’ पित्याला घाव सोसावे लागत आहेत. अशा वादळात… रणसंग्रामातही सुप्रिया सुळे समर्थपणे खडकाप्रमाणे उभ्या राहून संघर्ष करत आहेत. ही जिजाऊंची लेक आहे, ही अबला नारी नाही. सासर आणि माहेर या कल्पना आता इतिहासजमा झाल्या आहेत.
हे ही वाचा >> मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”
जितेंद्र आव्हाड चाकणकर यांना उद्देशून म्हणाले, दुर्दैवाने आपण ज्या आयोगाच्या अध्यक्षा आहात. त्या आयोगाच्या प्रमुख असतानाही आपण अशा भेदभावाच्या भावना बाळगत असाल तर स्री अत्याचाराविषयी आपल्या काय भावना असतील, याचा विचारच न केलेला बरा! असो, यापेक्षा अधिक काही लिहिण्यात काही अर्थ नाही.