राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप केले आहेत. “जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली. त्यात त्यांना बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केली,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच असं असूनही पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, असं म्हटलं. ते रविवारी (१३ नोव्हेंबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण बाबासाहेब पुरंदरेंच्या परंपरेतील आहे. त्यांनी शिव छत्रपती लोकांच्या डोक्यावर मारला. तेव्हा बहुजन समाज अशिक्षित होता, त्याला अक्षरओळख नव्हती. त्यामुळे तो इतिहास चालत आला. मात्र, त्याच माध्यमातून जेम्स लेनची अनावरस औलादीने शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली. त्यात त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे ऋणनिर्देश केलेत.”

“पुरंदरेंना जेम्स लेनच्या पुस्तकाविषयी वर्षभर आधीच माहिती होतं”

“हे पुस्तक येणार याची माहिती पुरंदरेंनी सोलापूरच्या एका व्याख्यानमालेत एक वर्षापूर्वीच दिली होती. म्हणजे हे सगळं षडयंत्र सर्वांना माहिती होतं. जेम्स लेन त्याच्या पुस्तकाच्या पान क्रमांक ९३ वरील पाचव्या परिच्छेदात असं म्हटलं की, पुण्यात मस्करीने शिवाजी महाराजांचे खरे वडील दादोजी कोंडदेव आहेत. त्या पुस्तकाचे ऋणनिर्देश बाबासाहेब पुरंदरेंसह इतरांना आहेत,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“जेम्स लेनने माझ्याकडून प्रेरणा घेतल्याचं स्वतः पुरंदरेंनी सांगितलं”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “पुरंदरे एक वर्षापुर्वीच सांगतात असं पुस्तक येणार आहेत. तसेच माझ्याकडून प्रेरणा घेऊन अशी लोकं पुस्तकं लिहायला लागली आहेत, असंही पुरंदरे सांगतात. जेम्स लेनसारखे असे प्रकार सुरू झाल्यावर त्याला विरोध सुरू झाला. नंतर पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला.”

“जिजामाता पंतांबरोबर सागरगोटे खेळायचे का?”

“पुरंदरे इतिहासकार नव्हते. ते स्वतःही सांगतात की मी इतिहासकार नाही. ते कांदबरीकार होते. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं की, कंटाळा आल्यावर वेळप्रसंगी जिजामाता आणि दादोजी कोंडदेव सागरगोटे खेळत बसायचे. जिजामाता पंतांबरोबर सागरगोटे खेळायचे का?” असा सवाल आव्हाडांनी विचारला.

हेही वाचा :

“मराठे आपल्या आयांनाही पाठवायला कमी करणार नाहीत”

“स्वतःच्या सत्तेची बुज राखण्यासाठी मराठे आपल्या आयांनाही पाठवायला कमी करणार नाहीत, असं पुरंदरे सांगतात. असे अनेक प्रसंग आहे ज्यात शिवाजी महाराजांची उंचीच कमी करण्यात आली. या सगळ्याचा राग आमच्या मनात आहे आणि कायमचा असेल,” असंही आव्हाड नमूद करतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad serious allegations on babasaheb purandare about chhatrapati shivaji maharaj pbs