Jitendra Awhad claims Booth captured in Parli alleges Dhananjay Munde : सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी गुंड व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान केंद्र ताब्यात घेत विधानसभा निवडणूक जिंकल्याचा दावा विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. परळीमधील गुंडगिरी व दमदाटीच्या अनेक घटनांसंबंधीचे व्हिडीओ, ऑडियो व फोटो आव्हाडांनी अनेकदा शेअर केले आहेत. यासह बीडमधील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावरून आव्हाडांसह अनेक विरोधक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत असतानाच आता त्यांच्या निवडणूक विजयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमदार आव्हाड यांनी एक्सवरील एक पोस्ट (व्हिडीओ) गुरुवारी रिपोस्ट केली होता. यामध्ये एक व्यक्ती ईव्हीएम मशीनवर धनंजय मुंडे यांना मतदान करत असल्याचं दिसतंय. मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
दरम्यान, शनिवारी आव्हाड यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही लोकांची टोळी धनंजय मुंडेंच्या नावाने घोषणा देत काही लोकांना दमदाटी करताना, त्यांना धमाकवताना व मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आव्हाडांनी म्हटलं आहे की हिंसक मार्गाने, शस्त्रे व गुडांच्या ताकदीच्या जोरावर परळीत मतदान केंद्र ताब्यात घेतली होती. बूथ कॅप्चर करून परळीची निवडणूक जिंकल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. तसेच ते म्हणाले, पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये देखील अशा प्रकारे निवडणुका होत नसतील.
हे ही वाचा >> एकनाथ शिंदे की अजित पवार, अधिक विश्वासू सहकारी कोण? देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक उत्तर
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
आव्हाडांनी म्हटलं आहे की “संपूर्ण हिंसक मार्गाने हत्यारे, गुंड आणि ताकदीच्या जोरावर पूर्णपणे बूथ कॅप्चर, विरोधक उमेदवाराला दमदाटी व मारहाण, उमेदवाराच्या अंगरक्षक पोलिसालाही दमदाटी व धमकी, मतदारांना मतदान करताना अडकाठी व मारहाण, विरोधक उमेदवाराच्या समर्थकांना मारहाण, मतदान कोणी करायचे आणि कोणी नाही करायचे हे गुंडच ठरवणार, जो कोणी विरोधी उमेदवाराला मतदान करेल असा थोडासा जरी संशय आला तरी मतदाराला मारहाण करून हाकालपट्टी. अशा निवडणुका तर पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा उत्तर कोरियामध्ये सुद्धा होत नसतील. परळी! बूथ ताब्यात घेण्याचा अजून एक पुरावा”.
हे ही वाचा >> Ajit Pawar On Loan Waiver : अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही…”
व्हिडीओमध्ये नेमकं काय
जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत निवडणूक आयोगाला या प्रकाराची दखल घेण्याची विनंती केली आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांची टोळी “धनंजय मुंडेंचा विजय असो”, “एकच उमेदवार..धनंजय मुंडे” अशा घोषणा देत आहे. या घोषणा देत ही टोळी तिथे येणाऱ्या सामान्य लोकांना दमदाटी करताना दिसतेय. “कारमधून कोणीही उतरायचं नाही”, “कोण हाय रं तुम्ही?” “कशाला आलाय इथं?”, “निघा इथून” अशा धमक्या देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या टोळीने दोन जणांना मारहाणही केली. तसेच एका उमेदवाराच्या अंगरक्षकाला, पोलिसाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.