राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांसह फुटून गेलेले सगळेजण पाकिटमार आणि दरोडेखोर आहेत अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारीही अजित पवारांवर टीका केली होती. अजित पवार यांनी मुलींच्या जन्मदरावर बोलताना द्रौपदीचं उदाहरण दिलं होतं. त्यावर विचारलं असता अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं असं म्हटलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“अजित पवार हे उघडपणे सांगू शकतात की मी मोक्काचा आरोपी मी सोडवला. तसंच त्यांनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांबद्दल जे द्रौपदीचं वक्तव्य केलं तो किती विषारी विचार आहे. महाभारत वाचल्यावर समजत नाही का काय लिहिलं आहे द्रौपदीबद्दल? आजच्या लेकींना द्रौपदी म्हणणं हा कुठल्या स्तरावरचा विचार आहे? समस्त स्त्री वर्गाचा अपमान अजित पवार यांनी केला आहे. त्यांची मानसिकता अशीच आहे.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे पळून गेले तेव्हा अजित पवार पळून जाण्याच्या तयारीत होते
एकनाथ शिंदे जेव्हा पळून गेले तेव्हा अजित पवारही पळून जाण्याच्या तयारीत होते. त्या पलायनात माझ्या बरोबर सहभागी व्हा अशी अजित पवारांची मानसिकता होती. त्यांनी सगळ्यांना जमवलं. त्यातले काही जण अजित पवारांसह पळायला तयार झाले. आमच्यातले काही लोक होते ज्यांचे पाय लटपटत होते, त्यातला एक होता प्राजक्त तनपुरे त्याने सही करणार असं म्हटलं होतं. मात्र बाहेर येऊन मला म्हणाला की मी यांच्याबरोबर जाणार नाही. मी शरद पवारांबरोबरच आहे. ते सगळं झाल्यावर मला जयंत पाटील म्हणाले की मी वेडा माणूस नाही, हे पत्रच मी शरद पवारांना देणार नाही. शरद पवारांना एकटं पाडणार नाही. असं त्यांनी म्हटलं होतं. हे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचा भाजपासह जाण्याचा ठराव झाला होता का? यावर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा- “अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
राष्ट्रवादीतून फुटलेले सगळे पाकिटमार आणि दरोडेखोर
“राष्ट्रवादीतून फुटून गेलेले अजित पवारांसह सगळेजण पाकिटमार आणि दरोडेखोर आहेत. दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन लुटून घेऊन जातात आणि बायकोच्या गळ्यात घालतात. तसाच प्रकार घडला आहे. त्यांच्याकडे आत्ता असूदेत मंगळसूत्र पण येणारा काळ सांगेल कुठलं मंगळसूत्र खरं आहे? पाकिटमार कधी ना कधी पकडला जातो. हे पाकिटमार पकडले जाणार. पाकिटमार ते होतेच आम्ही बोलत नव्हतो. अजित पवारांनी पक्षावर दरोडाच घातला. जे काही घडलं ते सांगतात ३० जूनला. बैठक झाल्याचा पुरावा द्यावा. २५ जून ला म्हणाले शरद पवार सर्वस्व आहेत. एवढंच काय ३ जुलैला प्रश्न विचारण्यात आला अजित पवारांना की तुमचे अध्यक्ष कोण? त्यावर त्यांनी शरद पवार हेच नाव घेतलं. याला दरोडा नाही म्हणणार तर काय म्हणणार?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.