जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता हे वक्तव्य बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथे झालेल्या मेळाव्यात केलं होतं. त्या वक्तव्याचे पडसाद गुरुवारी राज्यभर उमटले. नाशिकमधल्या साधू आणि महंतांनी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात यावी अशी मागणी करणारी तक्रारच दाखल केली आहे. तसंच ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन, प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला. आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना एक खोचक सल्ला दिला आहे.
काय म्हणाले आहेत खासदार श्रीकांत शिंदे?
जितेंद्र आव्हाड वारंवार हिंदू देव-देवतांचा अपमान करतात. त्यांना त्याची सवय झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण ते ज्या मतदारसंघातून येतात त्या मतांसाठी असं राजकारण करणं आवश्यक आहे. पण जितेंद्र आव्हाड इतक्या खालच्या पातळीला जातील असं वाटलं नव्हतं. असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. प्रभू राम हे संपूर्ण देशाचं अराध्य दैवत आहे. त्यांच्याविषयी असं बोलणं हे निषेधार्ह आहे.
माझा त्यांना सल्ला आहे की…
जितेंद्र आव्हाडांना पीएचडी वगैरेही मिळाली आहे. ते खूप विद्वान आहेत. मला वाटतं त्यांनी हिंदू देवदेवतांवर न बोलता औरंगजेब, अल्लाउद्दीन खिलजी, अफझल खान यांनी काय केलं ते काय खात होते याचं प्रवचन मुंब्र्यात जाऊन दिलं पाहिजे. हिंदूंच्या देवदेवतांविषयी बोलण्यापेक्षा ही प्रवचनं करावीत असा खोचक सल्लाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य काय?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले होते.