औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वीच केलं. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांना खडे बोल सुनावले आहेत. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात असाही आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं असंही त्यांनी म्हटलंय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे नरेश म्हस्के यांनी?

जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वेगळा इतिहास कुणी लिहिला असेल तर माहित नाही. कारण जितेंद्र आव्हाड हे कायमच आपल्या सोयीने इतिहास मांडतात. औरंगजेबाला हिंदू धर्माचा तिरस्कारच होता. त्यामुळेच संभाजीराजेंचे अतोनात हाल करत त्यांची हत्या औरंगजेबाने केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायमच हिंदू धर्माचा आणि हिंदू धर्मातील तत्त्वांचा अपमान केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही त्याऐवजी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर का म्हणायचं नाही? जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं एक मंदिर बनवावं आणि उद्घाटन करायला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं असा खोचक सल्लाही नरेश म्हस्के यांनी दिला आहे. तसंच अशा पद्धतीने औरंगजेबाचे उदात्तीकरण योग्य नाही असंही म्हस्के यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.”

हेही वाचा – “जितेंद्र आव्हाड, औरंगजेबाच्या प्रेमाखातर अजून कोणत्या थराला जाणार?” गिरीश महाजन यांचा सवाल

धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक या वादावर काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक यावरून बरीच वादावादी झाली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला. शिवाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे हे गादीवर बसले. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसार ते पुढे जात होते. शिवाजी महाराजांनी धर्म ही व्याख्या महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य अशा तिघांत विणलेली होती. मराठा हा व्यापक शब्द होता. त्यात सगळे समाविष्ट होते. त्यामुळेच राज्याला रयतेचं राज्य म्हटलं गेलं. त्या रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले असा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. समकालीन जेवढे इतिहासकार आहेत त्यामध्ये परराष्ट्रातून आलेले इतिहासकारांनी संभाजी महाराजांबद्दल खूप चांगलं लिहून ठेवलं आहे असंही आव्हाड म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad should now build aurangzebs temple and invite ajit pawar sanjay raut and uddhav thackeray for the inauguration naresh mhaske reaction rno scj