Jitendra Awhad On Chhatrapati Shivaji Maharaj and Actor Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकर यांच्या या दाव्यावर तीव्र भाषेत संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणालेत?

“हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय”, अशा कठोर शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे.

इतकेच नाही तर आव्हाडांनी छत्रपती शिवरायांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही केला आहे. आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हणालेत की, “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे”.

“शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल”, असा इशाराही आव्हाडांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिला आहे. दरम्यान राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर सोशल मीडियावर अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो”.

Story img Loader