भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात संतप्त भावना उमटली होती. या संघर्षानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली आहे. या मागणीवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा समर्थकांवर टीका केली आहे.

चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंबरोबर चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी देशात मागील काही दिवसांपासून केली जात आहे. या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!,” अशा शब्दात भाजपा कार्यकर्त्यांवर आव्हाड यांनी टीका केली आहे.

१५ जून रोजी रात्री गलवान व्हॅलीत चीन व भारतीय सैन्यामध्ये झटापट झाली. हा संघर्ष शिगेला गेल्यानं २० भारतीय जवान यात शहीद झाले होते. तर चीनचेही काही सैनिक मरण पावले होते. मात्र, या घटनेनंतर सीमेवर तणाव वाढला. त्याचबरोबर देशातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. चिनी सैन्यानं गलवान व्हॅलीत केलेल्या या कृत्यानंतर देशभरातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. त्या मागणीवरून जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे.

Story img Loader