उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा करणार आहेत. सध्या या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. मतदारसंघात अजित पवार समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचे होर्डिंग्स लावले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं आहे. अजित पवार म्हणाले, “आगामी निवडणुकीत माझ्याविरोधात प्रचार केला जाईल, त्याला बारामतीच्या जनतेनं उत्तर द्यावं.” तसेच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली. त्यांनी पक्षाचा अध्यक्ष होण्यापासून वंचित ठेवल्याचा दावा केला. यावर आता शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते अजित पवार यांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला अधिकृतरित्या पक्षाचे अध्यक्ष होण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं? तुम्ही आजवर पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात? पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात? आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलो आहोत असे वागत आला आहात.” जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार यांनी रस्त्यावर उतरून एखादं आंदोलन केलंय का? त्यांनी असं आंदोलन केलं असेल तर ते दाखवावं. आंदोलन केल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर एकतरी गुन्हा दाखल झाला आहे का? त्यांच्यावर कुठला खटला चालू आहे का? त्यांनी फक्त शरद पवारांचं नाव वापरून सत्तेचं राजकारण केलं आहे.
जितेंद्र आव्हाड अजित पवारांना म्हणाले, तुम्ही शरद पवारांच्या रक्ताचे नसलात तरी तुम्ही नेहमीच त्यांच्या रक्तात होता. म्हणूनच तुम्ही इतकी महत्त्वाची खाती सांभाळलीत, इतकी मंत्रिपदं भूषवली. तुमची वादग्रस्त वक्तव्ये, तुमच्या चुका या पक्षासाठी घातक होत्या, तरीदेखील शरद पवारांनी त्या पाठीशी घातल्या, पोटात घेतल्या आणि तीच शरद पवारांची मोठी चूक होती. तुम्ही कुठे काय बोललात, धरणात ### गेलात, या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. याच चुका जितेंद्र आव्हाडने केल्या असत्या तर शरद पवारांनी त्याला पक्षात ठेवलं असतं का?
हे ही वाचा >> “माझं येणं आणि नारायण राणेंचं जाणं…”, अशोक चव्हाणांनी सांगितली भाजपाची निवडणुकीची योजना
आव्हाड अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्ही उठता-बसता मला शिव्या देता. परंतु, मी तुमच्यासारख्या चुका केल्या असत्या तर शरद पवारांनी मला केव्हाच पक्षातून हाकललं असतं. तुम्ही पक्षात काय-काय कुरघोड्या करत होतात, आमच्याबद्दल शरद पवारांना खोटंनाटं सांगत होतात. कारण तुम्हाला तेवढेच धंदे होते.