बारामतीत आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीसाठी मी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. त्यावेळी काही लोक येतील भावनिक साद घालतील, ही शेवटची निवडणूक आहे सांगतील. पण तुम्ही मात्र अजित पवार उभा आहे हे समजून मतदान करा. शेवटची निवडणूक सांगतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत. असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांनी नाव न घेता ही टीका शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर आता या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मला अजित पवारांबरोबर काम केल्याची लाज वाटते असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हद्द ओलांडली आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं, याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय याचा विचार अजित पवार यांनी जरुर करावा असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.

हे पण वाचा- “मी आजपर्यंत कधीही काही मागितलेलं नाही..”, अजित पवार यांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन

काकाच्या मृत्यूची वाट बघतोय

आपल्या काकाच्या मृ्त्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल. काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे विसरु नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली. असं म्हणत आव्हाडांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

काकूचे कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघतोय

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही.”

तुमचा एक हिताचा निर्णय दाखवा

शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचं दिल्लीतल एक भाषण दाखवावं. साहेबांची खरी चूक आहे साहेबांनी अजित पवारला कधी ओळखलं नाही. राज्य उत्पादन मागितलं ते दिल फक्त पैसे खाण्यासाठी. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad slams ajit pawar over his statement on sharad pawar ncp last election in baramati scj