गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाशी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. वळसे पाटील म्हणाले, “शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडे शरद पवारांसारखं उत्तुंग नेतृत्व असूनही आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात,”
वळसे पाटलांच्या या टीकेला शरद पवार यांच्या गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड म्हणाले, तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा कुत्सित होता. फक्त कुत्सित भाषेत ते बोलले. मी पहिल्यापासून सांगतोय दिलीप वळसे-पाटील हे कुत्सित आहेत. कधी हसणार नाहीत, हसताना टोमणा मारतात. त्यांची टीपिकल सरंजाम वृत्ती होती. मी आहे मी… हा मीपणा कुठून आला? तर हा मीपणा ते शरद पवार यांचे ते लाडके असल्यामुळे आला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले शरद पवारांच्या दृष्टीने वळसे-पाटील हे पक्षातले सर्वात हुशार विद्यार्थी होते. त्यांचा हा विद्यार्धी नागपंचमीच्या दिवशीच बोलला. बिळात लपलेले नाग बाहेर पडू लागले आहेत. १८ वर्ष शरद पवारही मंत्री नव्हते. पण त्यांनी वळसे पाटलांना घरात बसून मंत्रीपदं दिली. कुठलीही मेहनत न करता या लोकांच्या (राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार) नावावर मतदारसंघ केले. पण तरीसुद्धा यांनी इतकं कृतघ्न असावं?
हे ही वाचा >> महायुतीला धक्का? महादेव जानकरांचा ‘एकला चलो रे’चा नारा; म्हणाले, “भीक मागून…”
आव्हाड यांनी दुपारी एक ट्वीट करून या प्रकरणावर त्यांचं मत मांडलं होतं. ते म्हणाले होते, “वळसे-पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटलं. शरद पवारांचा सर्वात विश्वासू साथीदार आणि शरद पवारांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. शरद पवारांच्या नजरेनं या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. हे लोक कधी त्यांच्या बाजुच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाहीत.”