Uddhav Thackeray Sena EX Leader Abhishek Ghosalkar Shot Dead : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्थानिक गुंड मॉरिस नरोन्हाने गोळ्या झाडून हत्या केली. तसेच हत्येनंतर मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडत आत्महत्या केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एकाच आठवड्यात मुंबईत दुसरी गोळीबाराची घटना घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. महाविकास आघाडीतील पक्षांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून सरकारविरोधात टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याप्रकरणी राज्य सरकारवर खोचक टीका केली. सरकारने आता मागेल त्याला ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ ही अभिनव योजना सुरू करावी, अशी सूचना आव्हाड यांनी दिली आहे.

पोलिसांवर फक्त विरोधक संपविण्याची जबाबदारी

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर तीन ट्विट्स टाकून अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचा निषेध केला. ते म्हणाले, “महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात!”

मॉरिस नरोन्हाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध? पूर्ववैमनस्यातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे! इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई… अजून काय माहीत किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई खुनांचा थरार सुरूच आहे.”

Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेनेचा कार्यकर्ता ते तडफदार नगरसेवक, गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर कोण होते?

गोळीबार प्रकरणातील मयत आरोपी मॉरिस नरोन्हाचे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी संबंध होते, असे दिसून येत आहे. मात्र तो कोणत्याही राजकीय पक्षामध्ये कार्यरत नव्हता, हे प्राथमिक माहितीवरून दिसून येत असून तो आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत काही सामाजिक कामे करीत होता. जितेंद्र आव्हाड यांनी मॉरीस नरोन्हाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा एक फोटो एक्स अकाऊंटवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला.

फेसबुक लाइव्ह दरम्यान गोळीबार

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी मॉरिस याने फेसबुक लाइव्ह केले होते. आम्हा दोघांना एकत्र पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण आयसी कॉलनीच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये सांगितले. सुमारे साडेचार मिनिटे दोघेही एकत्र बोलल्यानंतर मॉरिसने त्यांच्यावर गोळीबार केला. फेसबुक लाइव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. काही वेळानंतर हा प्रकार कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्या सर्वांनी घोसाळकर यांना रुग्णालयात नेले.

Story img Loader