राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) आज (२५ ऑगस्ट) कोल्हापुरातल्या दसरा चौकात ‘स्वाभिमान सभा’ पार पडली. या सभेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाषणं केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील बंडखोर आमदारांसंह, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड म्हणाले, बिळातले साप आता बाहेर पडले आहेत, त्यांना कोल्हापुरी पायतानाने ठेचलं पाहिजे.
जितेंद्र आव्हाड कोल्हापुरातील जनतेसमोर म्हणाले, आज मी तुम्हाला गद्दारी कशी होते ते सांगणार आहे. शाहू महाराज हे याचे साक्षीदार आहेत. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती (कोल्हापूरचे शाहू महाराज दुसरे) उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड शाहू छत्रपतींकडे पाहून म्हणाले, महाराज तुमच्याकडे रायफलचा एक मोठा क्लब होता. त्या संपूर्ण क्लबला शाहू महाराजांनी (राजर्षी शाहू महाराजांनी) आर्थिक सहकार्य केलं होतं. दिलदार मनाने महाराजांनी त्यांना पैसे दिले होते. परंतु, नंतर काही दिवसांनी तिथे बॉम्ब सापडले. हे बॉम्ब शाहू महाराजांना मारण्यासाठीच तिथे आणले होते. त्या रायफल क्लबमध्ये शाहू महाराजांची हत्या करण्यासाठी बॉम्ब आणून ठेवले होते. म्हणजे ही गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते. आता ती गद्दारी महाराष्ट्रात दिसू लागली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागली आहे. हे साप बिळात होते. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान! या पायतानाचा उपयोग अख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे.
हे ही वचा >> Chandrayan 3 : चांद्रमोहिमेच्या यशामागचे मराठमोळे हात, नांदेडच्या संशोधिकेचं ‘विक्रम’च्या लँडिंगमध्ये मोठं योगदान
दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज कोल्हापुरातल्या सगळ्या वस्तादांना भेटायला आमचा वस्ताद आला आहे. आमचा वस्ताद लय भयंकर आहे. त्यांनी जर कोणाला कुस्तीचं आव्हान दिलं तर समोरच्या पैलवानाची अवस्था बिकट होते.