भाजपा आमदार नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. आता त्यांनी त्यांचा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वळवला आहे. राणे यांनी नुकतीच आमदार जितेंद्र आव्हाडांवर टीका केली होती. राणे आव्हाडांना ‘चायना मेड’ म्हणाले होते. या टीकेला आता जितेंद्र आव्हाडांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कोण चायनीज आहे ते त्यांनी स्वतःकडे बघून ठरवावं”
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी चायना मेड आहे किंवा मी चायनिज आहे हे त्यांनी स्वतःकडे बघून ठरवावं. त्याचं त्यांनी स्वतःच आकलन करावं. आपण कसे आहोत हे त्यांनी तपासून घ्यावं. अशा छोटी उंची आणि भेजा छोटा असलेल्या लोकांवर काही बोलायचं नसतं. मी यांच्याकडे लक्ष देत नाही. जोकर्सना त्यांचे जोक मारू द्यायये असतात आणि आपण त्यावर हसायचं असतं. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात अशा लोकांना कधी फारसं गांभीर्याने घेतलं नाही.
हे ही वाचा >> “१२ वर्ष काँग्रेसने आम्हाला कधीच…”, नितेश राणेंनी वडिलांसमोर व्यक्त केली खंत
दरम्यान, नितेश राणे यांनी संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा केला आहे. या दाव्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, काही काम नसल्यावर लोक ज्योतिष बघायला सुरुवात करतात. त्यांना गांभीर्याने घेतलं जात नाही. कारण काही लोकांना असंच सोडून द्यायचं असतं. फारसं गांभीर्याने घ्यायचं नसतं.