महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील आपल्या सभेमधून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी राज ठाकरेंना तुमचं राजकारण केवळ शरद पवारांपुरतं मर्यादित आहे का असा सवाल केलाय.

नक्की वाचा >> “त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशन झालं, त्यानंतर…”; शरद पवार ब्राह्मणांचा द्वेष करत असल्याच्या आरोपावर आव्हाडांचं उत्तर

राज शरद पवारांबद्दल काय बोलले?
औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळावरील मैदानावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याच्या अलिकडेच दिलेल्या टोल्याला उत्तर देत केली. प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भ सांगत त्यांनी पवार हे सोयीचे प्रबोधनकार सांगातात. खरे ख्रश्चन मिशनरींच्या विरोधात हिंदूमशनरी सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मातील अनेक चुकीच्या बाबीवर लिहून ठेवले आहे. पण सोयीने तेवढे पवार सांगातात असे ते म्हणाले. जेम्स लेन प्रकरण पुढे करुन शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांना खरे तर शरद पवार यांना हिंदू शब्दांचीच अलर्जी असल्याची टीका केली. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व व्देष वाढल्याच्या अरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

पवारांच्या दारात येऊन तुमचं राजकारण संपतं का?
आव्हाड यांनी याच मुद्द्यावरुन बोलताना राज यांच्या भाषणामध्ये केवळ शरद पवारांवर टीकेचा समावेश होता या मुद्द्यावरुन टीका केलीय. “महाराष्ट्रापुरत्या काही समस्या नाहीयत का, देशापुढे काही समस्या नाहीयत का. तुमचे राजकीय विचार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकच्या दाराबाहेर येऊन संपतात का? शरद पवार या व्यक्तीकेंद्रीत राजकारणापुरतेच तुम्ही मर्यादित आहात का?,” असा प्रश्न आव्हाड यांनी राज ठाकरेंना विचारलाय. तसेच, “समाजाचे इतर काही प्रश्न आहेत, इतर काही लढे आहेत हे तुम्हाला तुमच्या भाषणातून मांडता येत नाही का?,” असंही आव्हाड यांनी विचारलं आहे.

नक्की वाचा >> जेम्स लेन प्रकरणावरुन आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे फिलॉसॉफर नव्हते, त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही… “

चैत्यभूमीचाही केला उल्लेख…
“आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज ठाकरेंसारखा उत्कुष्ट वक्ताच नाहीय. पण म्हणून तुम्ही शरद पवारांना टार्गेट करुन गोळ्या मारतायत. मला समजत नाही तुम्हाला त्यातून मिळणार काय आहे,” असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. पुढे बोलताना आव्हाड यांनी, “महाराष्ट्र अनेक दृष्ट्याने विचार करत असतो. हा विचारवंताचा, ऋषी मुनींचा, संतांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र उगाच नाही घडला. उगाच नाही इतके क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर तयार झाले. उगाच नाही इते एवढं साहित्य तयार झालं. तो हा इथल्या मातीचा आणि नद्यांचा गुण आहे. जरा जमलं तर चैत्यभूमीला जाऊन या दर्शन घेऊन या म्हणजे तुम्हाला हे समजेल की भारताच्या संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे, कारण आपण भारताचे नागरिक आहोत,” असा टोला आव्हाड यांनी लगावलाय.

प्रबोधनकारांबद्दल म्हणाले…
“त्यांच्या आजोबांबद्दल माझ्या मनात फार आदर आहे. ज्यांना ज्यांनी त्यांचे आजोबा वाचलेत त्यांना इथल्या धर्म व्यवस्थेबद्दल काय मतं होती ते माहिती आहे. माझ्या मुखातून नवे वाद होऊ नये म्हणून मी काही बोलत नाही. मला या विषयी काहीच बोलायचं नाहीय आणि नवा वाद निर्माणही करायचा नाहीय,” असं आव्हाड यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकांबद्दल आणि साहित्याबद्दल बोलताना म्हटलंय.

Story img Loader