महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेल्या सभेमधून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे खासदार आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि पवारांचे निकटवर्तीय असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी कठोर शब्दांमध्ये राज ठाकरेंवर टीका केलीय. यावेळी आव्हाड यांनी अनेक मुद्द्यांबद्दल बोलताना राज ठाकरेंकडून पवार ब्राह्मणांचा द्वेष करतात असा आरोप केल्याचा संदर्भ देत त्यावर उत्तरंही दिलंय.
नक्की वाचा >> “…म्हणून शरद पवारांना टार्गेट करुन गोळ्या मारताय, मला समजत नाही तुम्हाला…”; राज ठाकरेंवर आव्हाड संतापले
औरंगाबादमधील सभेत राज काय म्हणाले पवारांबद्दल
औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळावरील मैदानावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याच्या अलिकडेच दिलेल्या टोल्याला उत्तर देत केली. प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भ सांगत त्यांनी पवार हे सोयीचे प्रबोधनकार सांगातात. खरे ख्रश्चन मिशनरींच्या विरोधात हिंदूमशनरी सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मातील अनेक चुकीच्या बाबीवर लिहून ठेवले आहे. पण सोयीने तेवढे पवार सांगातात असे ते म्हणाले. जेम्स लेन प्रकरण पुढे करुन शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांना खरे तर शरद पवार यांना हिंदू शब्दांचीच अलर्जी असल्याची टीका केली. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व व्देष वाढल्याच्या अरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
राज ठाकरे ठाण्याच्या सभेत नेमकं काय म्हणालेले?
“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेमधील भाषणातून केला होता.
आव्हाडांनी दिलं उत्तर
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना तसेच औरंगाबादमधील सभेसंदर्भात भाष्य करताना आव्हाडांनी टीका केलीय. “किती सभा झाल्या असतील बाळासाहेबांच्या आणि शरद पवारांच्या याची मोजणी केली तर राज ठाकरे गुणिले हजार. इतक्या सभा झाल्या असतील त्यांच्या म्हणजे साहेबांच्या निवडणुकीतील सभा ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्या सुरु व्हायच्या सकाळी आठला आणि त्या काळात संपायच्या दोनला. त्या काळात पवारांची अमरावतीला सभा झालेली तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा सभेच्या एक दिवस आधी त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले जिथे. तेव्हा अधिक काही बोलायला लावू नका,” असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरेंना लगावलाय.
तुलनाही करु नका
“तुमची आणि शरद पवारांच्या राजकीय जीवनाची तुलनाही करु नका,” असा सल्लाही आव्हाडांनी राज यांना दिलाय. “शरद पवार असे आहेत, तसे आहेत असं तुम्ही म्हणता. ते जातीयवादी आहेत असं म्हणता. ते काहीतरी सभेमध्ये बोलले की ते पुरंदरेंचा ब्राह्मण होते म्हणून ते द्वेष करत होते. मग कुसुमाग्रज पण ब्राह्मण होते,” असं म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंनी केलेला आरोप खोडून काढला.
सांगितलं कॅन्सरच्या काळात मदत करणाऱ्याबद्दल
तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी शरद पवारांचं कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीसंदर्भात माहिती दिली. “त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशन झालं. त्यानंतर अगदी कंम्पाउण्ड म्हणून त्यांची ज्यांनी सेवा केली. जे त्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत, विमानात त्यांच्यासोबत, हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत होते त्या डॉक्टरांचं नाव आहे रवी बापटय आता मी त्यांची जात सांगायची का? असे जातीवरुन मित्र ठरतात का? हे काय बोलतोय आपण कशावर बोलतोय आपण,” असं म्हणत आव्हाड यांनी राज यांच्या जातीयवादाच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.