भाजपा नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा उल्लेख करत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. गावितांवर सध्या विरोधकांकडून टीका सुरू आहे. एका भाषणादरम्यान, विजयकुमार गावित म्हणाले, “तुम्ही ऐश्वर्या रायला बघितलंय ना? ती बंगळुरूजवळच्या समुद्राच्या किनारी राहणारी, ती दररोज मासे खायची, बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते, डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते.” यावेळी गावित यांनी मासे खाण्याचे इतर फायदे, त्यातल्या तेलाचे फायदे सांगितले.
विजयकुमार गावित यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही गावितांवर जोरदार टीका केली. आव्हाड म्हणाले, मी आजपासून मासे खायला सुरुवात करतोय. आज सकाळीच मासे खाऊन घराबाहेर पडलो आहे. गावितांनी नवीन शोध लावलाय. डॉक्टर आहेत ना ते त्यामुळेच… कदाचित त्यांना औषधोपचार माहिती असतील. त्यात व्हिटॅमिन डी वगैरी काहीतरी असतं, त्यात कसलंतरी ऑईल असतं, मासे प्रोटिन्सने भरलेले असतात वगैरे काहीतरी माहिती असेल त्यांना.
हे ही वाचा >> “मी समझोता करण्यासाठी नकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी….”; अनिल देशमुखांचा भाजपावर गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड म्हणाले, विजयकुमार गावितांनी आता अभ्यास वर्ग घ्यायला हवेत. त्यांच्याकडे चांगले भरपूर विद्यार्थी येतील. पोरी कशा पटवाव्यात असा त्यांचा सल्ला आहे. मंत्री चांगले सल्ले देत आहेत. राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांशी, अडचणींशी या सरकारचं काही देणंघेणं नाही. ते आता मंत्री झाले आहेत. याच्यातच ते इतके भयंकर खूश आहेत की त्यांना महाराष्ट्राशी काही देणंघेणं राहिलेलं नाही. आग लगे बस्ती में, मस्तराम मस्ती में, अशी स्थिती आहे. हे सगळे मस्तराम आहेत. महाराष्ट्र जळतोय, जळू द्या, असंच सुरू आहे.