शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काही महिन्यांपूर्वी पडलेल्या फुटीमुळे दोन वेगळे गट आणि त्यानुसार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हा वाद आता न्यायालयात व निवडणूक आयोगाबरोबरच विधानसभा अध्यक्षांसमोरही गेला असून त्यावर ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश न्यायालयाने राहुल नार्वेकरांना दिले आहेत. आज शिर्डीत शरद पवार गटाच्या शिबिराच्या निमित्ताने आलेल्या जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करताना गंभीर आरोप केला आहे.

शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनाला शरद पवारांसह राज्यभरातील महत्त्वाचे नेत व पदाधिकारी हजर झाले आहेत. या शिबिरात शरद पवारही पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर परखड शब्दांत टीका केली आहे.

“६ तारखेला अयोध्येत जे घडलं ते…”, अटल बिहारी वाजपेयी तेव्हा काय म्हणाले होते? राऊतांनी ट्वीट केला Video!

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. “मला पालकमंत्रीपद देऊच दिलं नाही. ते फक्त एकनाथ शिंदे अजित पवार मिळून ठरवत होते. मी अजित पवारांना स्वत: भेटून सांगितलं होतं की मला पालकमंत्रीपद द्या. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: भेटून म्हणाले की ‘जितेंद्र, आम्हाला रायगड हवं होतं. आम्ही तुम्हाला पालघर द्यायला तयार होतो. मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं. पण ते म्हणाले अजित पवार कुठल्याही परिस्थितीत रायगड सोडायला तयार नाहीत. रायगड त्यांना आदिती तटकरेला द्यायचं आहे”, असं जितेंद्र आव्हाड माध्यमांना म्हणाले.

“करोना झाला म्हणून मी काय मेलो का?”

दरम्यान, करोना झाल्यानंतर दोनच तासांत आपलं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. “माझा प्रश्न त्यांना तेवढाच होता की मी काय ज्येष्ठ मंत्री नाही? मी या पक्षाचा कार्यकर्ता नाही? मला करोना झाला आणि दोन तासांत तुम्ही पालकमंत्रीपदावरून काढता? त्यानंतर करोना झालेल्या किती जणांना काढलं तुम्ही? या पक्षात सावत्र होतो का मी? का नाही सांगितलं की करोना झालाय तर बरा होईल आणि मग पुन्हा घेईल पालकमंत्रीपदाचा कार्यभार? मी झालो ना बरा? मेलो नाही ना? तुम्हाला स्वत:ला करोना झाला, का नाही राजीनामा दिला? मंत्रीमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांना करोना झाला, मग त्यांचा राजीामा का नाही घेतला? एकट्या जितेद्र आव्हाडचा राजीनामा घेतला”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

Story img Loader