राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज तसेच अफजल खान आणि शाहिस्तेखानाविषयी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला जात आहे. भाजपाकडून आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला जात असून काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनदेखील केले आहे. आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यामुळे आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र तरीदेखील भाजपाकडून आव्हाडांवर आक्रमकपणे टीका केली जात आहे. यावरच आता आव्हाडदेखील आक्रमक झाले आहेत. मी केलेल्या विधानानंवर सारवासारव करत नाही. मी याआधीही कधी तसे केलेले नाही. मी फार विचार करूनच बोलतो. अंदमान, निकोबर तसेच तुरुंग काढून टाका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास समजावून सांगा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> शिवाजी महाराजांविषयीच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नवे ट्वीट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “मी जे बोललो ते…”
राष्ट्रवादी ४०० ते ५०० जणांची फौज घेऊन उभी होती
“आंदोलन भाजपाकडून केले जात आहे. ३० ते ४० पोरं होते, असे म्हणतात. राष्ट्रवादी ४०० ते ५०० जणांची फौज घेऊन उभी होती. जरा पुढे आले असते तर मजा आली असती. पोलीस संरक्षणात होते. त्यांच्याकडून सगळ्या महारापुरुषांचा अमान करू झाला. संभाजी महाराज, शिवाजी महाराज, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुलेंचा अपमान करून झाला. आता बहुजन आवाज बाहेर आल्यानंतर त्यांना आग लागली आहे. जितेंद्र आव्हाड असे बोलले तसे बोलले म्हटले जात आहे. मी संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
महिषासुरमर्दिनीची पूजा का होते, तर…
“मी आणखी एक पौराणिक संदर्भ देतो. तुम्ही महिषासुरमर्दिनी मातेचे चित्र बघता ना. देवीच्या पायाखाली महिषासुर असतो. तो महिषासुर काढून टाकल्यानंतर देवीला काही अर्थ राहतो का. महिषासुरमर्दिनीची पूजा का होते, तर महिषासुर तिच्या पायाखाली आहे. देवी महिषासुर रुपी वाईट प्रवृत्तीचा वध करते, म्हणूनच त्याला अर्थ आहे,” असे उदाहरणही आव्हाड यांनी दिले आहे.
हेही वाचा >>> ‘…म्हणून शिवाजी महाराज आहेत,’ विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नवे ट्वीट, प्रभु रामांचा उल्लेख करत म्हणाले, “रावण काढून…”
त्यांना संभाजी महाराज एका धर्मात बंद करून ठेवायचे होते
“शिवाजी महाराजांनी लाखाचे सैन घेऊन अफजलखानाला पाच जणांना सोबत घेऊन मारून टाकले. म्हणूनच त्याला अर्थ आहे. त्यांना शिवाजी महाराजांची महानता लोकांना समजू द्यायची नाही. त्यांना संभाजी महाराज एका धर्मात बंद करून ठेवायचे होते. औरंगजेबाचा बंडखोर पुत्र औरंगजेबाशी भांडला होता. तसेच दिल्लीची सल्तनत संभाजी महाराजांना आपण दोघे ताब्यात घेऊया असे सांगतो. मात्र काही गद्दार सुलतान अकबराचे डोके फिरवू पाहतात. आपण संभाजी महाराजांना ठार करू आणि राज्यकारभार ताब्यात घेऊ असे अकबराला सांगतात. हीच बाब सुलतान अकबर संभाजी महाराजांना सागतो. त्यानंतर संभाजी महाराज त्या पाच जणांना हत्तीच्या पायाशी देतात. हा इतिहास त्यांना सांगू द्यायचा नाही. संभाजी महाराज, सुलतान अकबर मित्र होते. दोघांचेही वेगवेगळे धर्म होते. पण दिल्लीची सल्तनत ताब्यात घेण्याचा त्यांचा उद्देश एकच होता. हे संदर्भ द्यावे लागतात. त्याशिवाय इतिहास सांगता येत नाही,” असेही आव्हाड म्हणाले.
हेही वाचा >>> “तुम्ही लिहून घ्या, आता मंत्रीमंडळ…”, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल!
तुरुंग काढून टाका आणि सावरकरांचे महत्त्व पटवून दाखवा
“मी कधीही सारवासारव करत नाही. मी माझ्या आयुष्यात तसे कधीही केलेले नाही. मी जे बोलतो ते विचार करून बोलतो. मी विचार साफ करून बोललेलो आहे. ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला वजा करता येत नाही. एक साधं उदाहरण देतो, उद्या अंदमान निकोबर आणि तुरुंग काढून टाका आणि सावरकरांचे महत्त्व पटवून दाखवा. त्यांचे महत्त्व समजावून सांगा. हिटलर होता म्हणून स्टालिन, चर्चिल, रुझवेल्ट एकत्र आले ना. हिटलरच नसता तर ते तिघे एकत्र आलेच नसते. हिटलर, मुसलोनी होता म्हणूनच दुसरे महायुद्ध झाले ना. हल्दी घाटीच्या लढाईचे उदाहरण द्या. अकबर विरुद्ध महाराणा प्रतापसिंह ही लढाई घ्या. यामध्ये अकबराला काढून टाका. मग महाराणा प्रतापसिंह यांच्यात शौर्य होते, हे कसे सांगणार तुम्ही. समोर अकबर आहे म्हणूनच सांगणे शक्य आहे,” असे आव्हाड यांनी सांगितले.