Jitendra Awhad take jibe at dy CM Ajit Pawar over farmers loan waiver : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जे फेडण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या सूचनेनंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकार सत्तेत आल्यानंतर ही घोषणा हवेतच विरल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
अजित पवार आज (२८ मार्च) एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं भाष्य केलं होतं. “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आज तारीख आहे २८ मार्च, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा.” यावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणालेत?
बॉलिवूड चित्रपटातील एका गाण्याचा संदर्भ देत दादा क्या हुआ तेरा वादा? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार यांना विचारला आहे “शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था करून ठेवलीत…पाण्याविना पिकं करपून गेलीत, काही भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे… लोकांना वीज बिल , शैक्षणिक खर्च , इतर वैयक्तिक कर्ज यामध्ये गुरफटून ठेवलं आहे… कुठून भरतील कर्जे आणि कुठून आणणार पैसा… ते सत्तेत थोडीच आहेत…तुम्हीच आश्वासने दिली होती…शेतकर्यांची कर्जे माफ करणार म्हणून… शेवटी जनता म्हणतेय, दादा क्या हुआ तेरा वादा… वो कसंम वो इरादा,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. याबरोबर त्यांनी अजित पवारांच्या त्या विधानाबद्दलच्या बातमीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था करून ठेवलीत…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 29, 2025
पाण्याविना पिकं करपून गेलीत
काही भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे…
लोकांना वीज बिल , शैक्षणिक खर्च , इतर वैयक्तिक कर्ज यामध्ये गुरफटून ठेवलं आहे…
कुठून भरतील कर्जे आणि कुठून आणणार पैसा…
ते सत्तेत थोडीच आहेत…
तुम्हीच आश्वासने… pic.twitter.com/mIf4ihR8ax
आव्हाडांप्रमाणेच काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील अजित पवारांच्या कर्जमाफीबद्दलच्या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यांनी याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल पोस्ट केली आहे.
हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते.
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) March 29, 2025
जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच ३१ मार्च पूर्वी पीक कर्ज… pic.twitter.com/xOH4P6LkZx
“हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच ३१ मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. २१०० चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर १५०० रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन १० लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि २१०० रुपये मिळण्यासाठी ५ वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत,” असे सपकाळ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.