महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं असून अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आलेले नाहीत. त्यामुळे त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसेल, तर त्यांनी आपला चार्ज इतरांकडे द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नसेल, तर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यावा, असा खोचक सल्ला देखील विरोधकांकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोण कुठे ३ महिने होतं, हे माहितीये”

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका करणाऱ्या विरोधकांना जितेंद्र आव्हाडांनी सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. “महाराष्ट्राला संभ्रमात टाकायचं, प्रश्नचिन्ह निर्माण करायचं ही विकृत पद्धती सगळ्यांनी सोडून द्यावी. कोण किती महिने आजारी होतं, कोण कुठे तीन महिने होतं या सगळ्या गोष्टी समजतात, काढता येतात. पण कुठल्याही माणसाच्या आजारपणाबद्दल बोलू नये, ही निदान आम्हाला शिकवलेली संस्कृती आहे. मुख्यमंत्री ठणठणीत आहेत, हे महाराष्ट्राला सांगण्यासाठी मी आलो आहे. बाकीच्यांना जे काही करायचंय, ते नेहमीप्रमाणे करू द्यात”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी येण्याची गरज मलाच वाटत नाही”

दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना पंतप्रधानांशी केली आहे. “मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं कुठे बंधन आहे का? ते अंतिम चर्चेला उपस्थित राहतील. पंतप्रधान स्वत: संसदेत किती दिवस अनुपस्थित असतात, हा प्रश्न तुम्ही विचारला का? आम्हाला त्यावरही काही बोलायचं नाहीये. अनेक दिवस ते संसदेत दिसले नाहीयेत. कारण काहीही असो. संसद चालू आहे. तसंच मुख्यमंत्री नसतानाही जबाबदार मंत्री आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांनी येण्याची काही गरज आहे असं मलाच वाटत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विधानसभेत बोलताना फडणवीसांनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, “आज त्यांनाही…!”

“माझा बापही आजारी पडतो..”

“मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत आहे. ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्या चुकीच्या आहेत. एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीशी राजकारण जोडणं ही विकृती आहे. ते आधिवेशनात आले नाहीत, याचा अर्थ काही वेगळा काढून त्यावर मस्करी करणं… ज्यांना वेड लागतं, तेच हे काम करतात. आजारी तर माझा बापही पडतो. मी त्याची सेवा करतो”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचे कसे?” ; असं म्हणत फडणवीसांचा विधानसभेत नवाब मलिकांवर निशाणा

“ते अधिवेशनात न आल्यामुळे काही नुकसान होत आहे का? जो नियम पंतप्रधानांना लागू आहे, तो नियम मुख्यमंत्र्यांनाही लागू करा ना”, असंही ते यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad targets bjp on cm uddhav thackeray absence mah assembly winter session pmw