राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एक्स’ अकाउंटवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यावर “दादांची फक्त शब्द फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय”, असं कॅप्शन लिहित अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. याच व्हिडीओचा धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुम्ही शब्दांचे पक्के असल्याचं छाती ठोकून महाराष्ट्राला सांगता. मग, शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह कशाला मागता?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीनं काय व्हिडीओ केला ट्वीट?

राष्ट्रवादीनं अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत अजित पवारांनी कशाप्रकारचे त्यांचे शब्द फिरवले, हे दाखवलं आहे. ट्वीटवर लिहिलं, “दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द! आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात!!.”

या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अजित पवार नेहमी म्हणतात, ‘मी छाती ठोकून बोलतो आणि तेच खरं असतं.’ आम्हीही तेच सांगतोय, तुम्ही बोलला त्याच्या विरूद्ध वागत आहात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘शिवसेना’ गेल्यावर अजित पवार म्हणाले होते, ‘उद्धव ठाकरेंच्या वडिलांचा पक्ष आणि चिन्ह आहे.’ मग, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह शरद पवारांचं आहे. कशाला मागत आहात?”

“तुम्ही शब्दांचे पक्के असल्याचं छाती ठोकून-ठोकून महाराष्ट्राला सांगता. मग, आता काय झालं? अजित पवारांना मी धोकेबाज म्हणणार नाही. कारण, त्यांच्याएवढा मोठा दादा मी नाही. पण, माणसानं शब्दाला जागालं पाहिजे. तुम्ही एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्हाबाबत सल्ला देत होता. मग, तुम्हाला कुणी सल्ला द्यायचा? मुळात तुम्हाला सल्ला दिलेलाच आवडत नाही. अजित पवारांपुढं कुणाचं चालत नाही. ‘मैं खाता ना वही, दादा कहै वही सही,'” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad taunt ajit pawar over ncp video party and symbol ssa