राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाचा शिर्डीतला जो मेळावा होता त्यात प्रभू रामचंद्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. प्रभू रामचंद्र मांसाहारी होते. रामाने वनवासात असताना मांसाहार केला असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. ज्यानंतर महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशात जितेंद्र आव्हाड यांनी एक सूचक पोस्ट लिहून अजित पवार आपल्या काकाला वनवासात ढकलायला निघाले असं म्हटलं आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट?
माझ्या घरावर अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारजण होते. श्रीरामाचा इतिहास माहित नसलेल्या अवलादींना श्र रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्रीरामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी रामाने चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य कारभार केला.
स्वतःच्या काकाला म्हणजेच बापाला घराबाहेर ढकलून
इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हाणून पाडू आम्ही ! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आई-वडिलांना मानायचे. तुमचे नेते आई-वडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवत आहेत. अशी पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.
दुसरीकडे आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
काय म्हटलं आहे आनंद परांजपे यांनी?
“जितेंद्र आव्हाड हे स्वतःला इतिहासाचे संशोधक मानतात. त्यांनी प्रभू रामचंद्राविषयी अभद्र वक्तव्य केलं आहे. प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. १४ वर्षे राम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो असं त्यांनी म्हटलं. मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे जे प्रभू रामाची महाआरती करायला गेले होते. मी पोलिसांचाही निषेध करतो, कारण त्यांनी आंदोलन केलं नाही तर महाआरती केली. जितेंद्र आव्हाड कायमच हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. आता पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर महाआरती करणार आहोत.” असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “जितेंद्र आव्हाडांवर २४ तासांत गुन्हा दाखल करा, अन्यथा वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर…”, अजित पवार गटाचा इशारा
जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य काय?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले होते.