राजकारणात वैयक्तिक टीका कुणीही कुणावर करु नये. हा असाच आहे, याची ढेरीच वाढली आहे, याच्या शर्टवर पानाचे ठिपके असतात अशी टीका कुणीही कुणावर करु नये. हे मोठ्या नेत्यांना शोभून दिसत नाही. माझ्याविषयी एवढा द्वेष कशासाठी आहे अजित पवारांना? मला जर फोन करुन त्यांनी सांगितलं की जितेंद्र पोट वाढतं आहे हार्ट अटॅक वगैरे येईल सांभाळ. तर मला अजित पवारांविषयी आदर वाटला असता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे मी इतका मोठा झालेलो नाही की शरद पवारांना काही समजून पक्ष फोडेन असाही टोला जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला.
अजित पवार माझा इतका द्वेष का करतात?
भर पत्रकार परिषदेत माझं पोट हे व्यंग आहे हे दाखवण्याचा हिडीस प्रकार अजित पवार यांनी केला. द्वेषातूनच हे सगळं आलं. माझ्याविषयी इतका द्वेष का? मी तुमचा राजकीय प्रतिस्पर्धी नाही. तुमच्या मतदारसंघाताला प्रतिस्पर्धी नाही, मी तुमच्या उंचीइतका होऊच शकत नाही याची मला कल्पना आहे. माझ्या निष्ठेबद्दल जर तु्म्हाला राग असेल तर तो राग सहन करण्याची ताकद मला परमेश्वराने दिली आहे. माननीय आर. आर. पाटील यांच्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा ते २४ तास रडले होते. मी कितीवेळा ऐकून घेतलं आहे की तुझी दोन बटणं उघडी आहेत. मी शर्ट कसा घालायचा? कुठल्या रंगाचा घालायचा हे काय विचारायला जायचं का? यावर पक्ष चालतो का? म्हणूनच मी म्हटलं होतं कुणाच्याही व्यक्तीगत आयुष्यावर टीका करु नका.
जितेंद्र आव्हाडला टपली मारली तरीही चालतं असं नाही
दरवेळी काहीही झालं की जितेंद्र आव्हाड. अजित पवारांना दुसरं नाव सापडत नाही का? छोट्या समाजातला आहे, त्याला टपली मारली तर काय होतं? तसं नाही होत. मला विचारलं लोकांनी तुझ्या पक्षात तुझ्या ढेरीबद्दल बोललं जातं. युद्ध वैचारिक असलं पाहिजे. मी आजवरही ३२ वर्षांच्या राजकारणात व्यक्तिगत टीका केली नाही.
मी अजून इतका मोठा झालो नाही
पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापण्यात आला तेव्हा अजित पवारांवर आरोप झाला होता तेव्हा त्यांची बाजू घेणारा जितेंद्र आव्हाड होता. ७० हजार कोटींचा घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा १० दिवस टीव्हीवर किल्ला लढवणारा माणूस जितेंद्र आव्हाड होता. जेव्हा तुमच्या बंगल्यांविषयी चर्चा झाली तेव्हा टीव्हीवर जाऊन बॅटिंग करणारा जितेंद्र आव्हाड होता. मी कुठे चुकलो दादा मला सांगा? होय मी शरद पवारांबरोबर आहे, मी त्यांच्याच बरोबर राहीन आणि मरेनही. मात्र मी अजित पवारांच्या व्यक्तिगत आयुष्यात कधीही काहीही बोललो नाही. अजित पवार पहिल्या भाषणात माझ्यावर बोललात, त्यानंतर प्रत्येकवेळी माझ्यावर बोललात. मी इतका मोठा नाही की शरद पवारांना काही समजून पक्ष फोडू शकतो. तुमचा समज-गैरसमज महाराष्ट्र ऐकणार नाही.