राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्यासंदर्भातील मुद्द्यावरुन चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. विशेष म्हणजे असं असतानाच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूर दौऱ्यानंतर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. ‘बहुजनवाद विरुद्ध मनूवाद’ या मथळ्याखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये आव्हाड यांनी शाहू महाराज आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना केलीय.
नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल
“आज कोल्हापूरमध्ये शाहुंच्या विचारांवरती जागर करायला गेलो होतो. सहज आठवलं कि सनातन आणि मनुवाद्यांनी असच शाहू महाराजांना घेरलं होतं. त्यांच्या बदनामीच मोठं षडयंत्र आखलं होतं. पण अशांना घाबरून शाहू महाराज थांबतील तर ते शाहू महाराज कसले. ह्या सगळ्यांना लाथाडून त्यांनी आपले विचार लोकांच्या मनामनात पोहचवले. त्यांना थांबविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आणि ते सनातनी आजही कोणाच्या लक्षात नाहीत. पण शाहू महाराज आणि त्यांचे विचार हे संपूर्ण देशात घराघरात आहेत,” असं आव्हाड यांनी पहिल्या दोन ट्विटमध्ये म्हटलंय.
पुढेच याच ट्विटच्या थ्रेडमध्ये आव्हाड यांनी शरद पवारांसंदर्भातही असेच काहीसे घडल्याचा म्हणत पवारांची थेट शाहू महाराजांशी तुलना केलीय. “असच काहीसे शरद पवारांच्या बाबतीत घडतयं. चहुबाजूनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न सनातनी आणि मनुवादी करीत आहेत. एका चक्रव्यूहात अडकून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण अशांना घाबरून शरद पवार साहेब थांबतील तर ते शरद पवार कसले. जेव्हा जेव्हा बहुजनवादी विरुद्ध सनातनवादी युद्ध होते. तेव्हा तेव्हा हे सगळं घडतच राहत. आणि काळ त्याला साक्षीदार आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलंय.
सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणामधील सर्वात मोठं नाव असणाऱ्या शरद पवार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी शिवसेना सांगेल त्या उमेदवाराला मतदान करु असं स्पष्ट केलं होतं. यामुळेच भाजपाने शरद पवारांनी घुमजाव केल्याचा आरोप केला होता. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी प्रत्यक्ष कोणाचा उल्लेख न करता हे ट्विट्स केल्याची चर्चा आहे. आव्हाड यांच्या या ट्विटखाली अनेकांनी रिप्लाय देऊन हा वाद वाढण्याचा हा राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा प्रयत्न असल्याचेही ट्विट्स पहायला मिळत आहेत.