राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. आमदार रवी राणा आणि त्यांची खासदार पत्नी नवनीत राणा यांनी मुंबईमधील मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आंदोलन असो, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेला हल्ला असो किंवा मग मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला असा या सर्वांचा संदर्भ देत राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाकडून केला जातोय.

नक्की वाचा >> “मंगेशकर कुटुंबीयांची ‘ही’ कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी”; जितेंद्र आव्हाडांनी मंगेशकर कुटुंबावर साधला निशाणा

“राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांनी या सागळ्यामध्ये लक्ष घालवं. सध्याची राज्यामधील परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे,” असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं होतं. यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं आहे. असं असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज रात्री एक वाजता केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन २५ एप्रिल रोजी म्हणजेच आज रात्री एक वाजून एक मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आलीय. “राष्ट्रपती राजवट लावा… लै मजा येईल” असं सहा शब्दांचं ट्विट आव्हाड यांनी केलंय.

नेमका या ट्विटचा संदर्भ काय आहे? आव्हाड यांनी असं का म्हटलं आहे. एकीकडे आतापर्यंत भाजपाच्या नेत्यांकडून आणि विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असतानाच राष्ट्रवादीचे सर्वसर्वा आणि महाविकास आघाडी सरकराचे जनक शरद पवार यांचे निकटवर्तीय असणाऱ्या आव्हाडांनी असं ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपाची भूमिका काय?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील प्रश्न दोन दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली होती. “तुम्हाला वाटतं का राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आलेली आहे?” असा प्रश्न पत्रकाराने पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या पोटात इतकी भीती आहे की काहीही झालं की त्यांना राष्ट्रपती राजवट आठवते,” असं पाटील म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीची मागणी आम्ही…; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
तसेच पुढे बोलताना चंद्रकांत पाटलांनी, “आम्ही काही राष्ट्रपती राजवटीची मागणीही केलेली नाहीय. आम्ही व्हाया राज्यपाल राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं नाहीय. पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं नाहीय,” असं सांगितलं. त्याचप्रमाणे, “राणाजी कशाला सामन्य माणसालाही अधिकार आहे की त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी,” असंही पाटील म्हणाले. “आम्ही काही अशी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. त्याचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.