महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेले दोन दिवस ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल हे भावनिक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, या युक्तिवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“आज कपिल सिब्बल जेव्हा सर्वोच्च न्यायालयात एका राजकीय पक्षाची भूमिका मांडत होते, तेव्हा असं वाटत होतं की, भारतीय संघराज्यामधील संसदीय लोकशाही जिवंत रहावी यासाठी ते तळमळीने बाजू लावून धरत आहेत. तेव्हा त्यांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.
हेही वाचा – विश्लेषण : पक्षनाव व चिन्हासाठी उद्धव ठाकरे यांना झगडावे लागणार?
कपिल सिब्बलांची भावविक टीप्पणी
दरम्यान, अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला. युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल हे भावनिक झाल्याचं बघायला मिळालं. “मी हरेन किंवा जिंकेन. मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे. जर न्यायालयानं हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल”, अशी टीप्पणी कपिल सिब्बल यांनी केली.