औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर भाष्य करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजपाकडून घेतला जातो आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांचा हा व्हिडिओ ट्विट करत औरंगजेबाच्या प्रेमाखात आणखी कोणत्या थराला जाणार आहात असा प्रश्न विचारला आहे.
काय म्हटलं आहे गिरीश महाजन यांनी?
जितेंद्र आव्हाड, ठराविक मतांसाठी इतिहासाचे विकृतीकरण करून अकलेचे किती तारे तोडणार आहात? औरंगजेबाच्या प्रेमाखातर आणखी कोणत्या थराला जाणार आहात? बेताल वक्तव्य करून धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असं ट्विट गिरीश महाजन यांनी केलं आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर ही पदवी देऊ नका ते धर्मवीर नव्हते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य रयतेसाठी निर्माण केलं त्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं असं वक्तव्य केलं. त्यानंतर अजित पवार यांच्यावर भाजपाकडून आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून सातत्याने टीका होते आहे. तसंच त्यांच्या विरोधात आंदोलनंही केली जात आहेत. अशात आज या वादावर बोलताना औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रचंड टीका केली जाते आहे.
हेही वाचा – संभाजी महाराज ‘धर्मवीर’च, अजित पवारांचा मुद्दा चुकीचा; संभाजीराजे छत्रपती यांचे वक्तव्य
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.”
भाजपाचे नेते राम कदम यांचीही आव्हाडांवर टीका
राष्ट्रवादीचे नेते म्हणतात औरंगजेब क्रूर नाही. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना हलाहल करून अत्यंत निर्दयतेने जीवे मारलं. ज्यांच्या डोळ्यांमध्ये तळपत्या सळ्या घालून डोळे बाहेर काढले गेले, तो औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रूर नाही? निर्दयतेचे आणखी कोणते उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवे आहे. राष्ट्रवादी पक्षाचे हे सगळं ठरवून चाललेलं आहे.”
हेही वाचा – “शेंबडं पोरगंसुद्धा…”, सावरकर आणि गोळवलकरांबाबतच्या ट्वीटनंतर जितेंद्र आव्हाड ट्रोल
“औरंगजेबाचा एकाठिकाणी उदो उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कमी लेखायचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी. या महाराष्ट्राच्या भूमीत उदो उदो हा फक्त संभाजी राजे आणि शिवरायांचा होईल. औरंगजेबाचा कधीच होणार नाही. आमचा सवाल श्रीमान उद्धव ठाकरेंना आहे. जे औरंगजेबांचा उदो उदो करतात त्यांच्यासोबत आपण आणखी किती काळ राहणार?”, असा सवाल उपस्थित करत राम कदम यांनी शिवसेनेला डिवचले.